मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला दिले.
मुंबईतील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांनी जामीन मिळावा, यासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने वरील निर्देश दिले आहेत.
मुंबई सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राऊत यांच्या जामिनीच्या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला १६ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी राऊत यांच्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.