जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेली देवता श्री गणेश !

गणेशोत्सव २०२२

वर्ष २०१९ मध्ये ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीने आफ्रिकेतील देश घाना येथील हिंदू गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करतात, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ प्रसारित केला होता. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानेही तो व्हिडिओ पुन्हा एकदा सर्वत्र प्रसारित होत आहे (‘व्हायरल’ होत आहे). त्यामध्ये वर्ष १९४० च्या दशकात घाना येथे गेलेल्या हिंदु कामगारांमुळे हिंदु धर्माचा तिथे प्रसार झाला आणि तेथील स्थानिक लोकही हिंदु धर्माच्या शिकवणीने प्रभावित होऊन त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला असल्याचे सांगण्यात आले आहे. आज तेथील अनेक लोक श्री गणेशचतुर्थीचे व्रत पाळतात. यातून हिंदूंचे आराध्य श्री गणेश यांच्या उपासनेच्या विस्तारत्वाची कल्पना येऊ शकेल. प्रस्तुत लेखातून नेमक्या याच विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. दैनिक ‘नवशक्ति’मध्ये प्रकाशित झालेला हा लेख सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमच्या वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत.

(पूर्वार्ध)

प्रार्थना !

‘हे बुद्धीदात्या आणि विघ्नहर्त्या श्री गणेशा, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व अडथळे आपण दूर करा. हे धर्मकार्य करण्यासाठी आम्हाला बुद्धी अन् शक्ती प्रदान करा ! या कार्यात आमचा सहभाग करवून घेऊन आमचा उद्धार करा, अशी आपल्या सुकोमल चरणी आमची भावपूर्ण प्रार्थना आहे !

गणेश ही जगातील सर्वांत लोकप्रिय देवता आहे. हिंदुस्थानी माणसे विदेशात जेथे जेथे गेली, तेथे तेथे त्यांनी मराठी मंडळे स्थापन केली. जीवनात यश लाभण्यासाठी त्यांनी गणेशभक्ती केली आणि गणपतीची मंदिरेही स्थापन केली. जगभरात गणपति आणि त्याची मंदिरे यांविषयी माहिती देणारा हा लेख !

१. जगभरात गेलेल्या हिंदूंसमवेत गणपतीची भक्ती आणि त्याचे स्वरूपही पोचणे

‘सध्या गणेशोत्सव जगातील अनेक देशांमध्ये भव्य स्वरूपात होतो. जगभरात जेथे जेथे हिंदुस्थानी माणसे गेली, तेथे तेथे त्यांनी गणपतीची भक्ती केली आणि त्यांच्या गणेशभक्तीचे स्वरूप विस्तारत गेले. या भक्तीमुळेच जगातही गणेशभक्ती ही मंदिराच्या स्वरूपात प्रकटली. जगातील प्रमुख मराठी भाषिक वस्तीत आज गणेशोत्सव अतिशय थाटात साजरा होतो. त्यामुळेच जगात गणपति लोकप्रिय देवता मानली जाते. अमेरिकेत एकूण ३९६, इंग्लंडमध्ये १७६, सिंगापूरमध्ये २८, कॅनडामध्ये ९९ (छायाचित्र क्रमांक १ पहा), जपानमध्ये ४१, जमैकामध्ये ३, मलेशियामध्ये ८, मॉरिशसमध्ये १, नेपाळमध्ये २; आयर्लंड, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, फ्रान्स, चीन, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड येथे
श्री गणेशाचे प्रत्येकी १ मंदिर आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे ५९ अन् स्वीडनमध्ये ३ मंदिरे (छायाचित्र क्रमांक २ पहा) आहेत.

२. हरिनामाने नास्तिक मनुष्यही आस्तिक होणे

मनुष्य कितीही नास्तिक असला, तरी गणेशभक्ती आणि हरिनाम यांनी रंगलेल्या वाणीतून निघालेला एखादा शब्द कानी पडला, तर तो आस्तिक होतो. प्रत्येक मनुष्याला दुःखमुक्त व्हावेसे वाटते. भावभक्तीची शिरापुरी थोडी खाल्ली, तरी संतकृपेचा किंवा गणेशकृपेचा अनुभव येतो. भक्तीतून अखंड आनंदाचा प्रत्यय माणसाला येतो.

३. जगातील विविध देशांमध्ये करण्यात येत असलेली गणेशाची भक्ती आणि त्याची मंदिरे !

विदेशात ४ थ्या किंवा ५ व्या शतकात श्री गणेशपूजनाला आरंभ झाला. काही संशोधकांच्या मते ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी १२०० वर्षांपासून विदेशात गणेशपूजनाला आरंभ झाला. पर्शियातील (आजच्या इराणमधील) एका खोदकामातही गणेशशिल्प सापडल्याच्या नोंदी आहेत. पॅरिसमधील एका संग्रहालयातही गणेशमूर्ती आढळते. वॉनडन बर्ग यांच्या मते, ‘पॅरिसमधील ही मूर्ती ख्रिस्तपूर्व १२०० वर्षापूर्वीची असावी’, अशी नोंद तेथे आहे. विदेशात काही ठिकाणी गणपतीच्या मूर्तीला मनुष्याप्रमाणे दाढी दाखवण्यात आली आहे; परंतु या दाढीविषयीची माहिती उपलब्ध झालेली नाही. हनोईतील (उत्तर व्हिएतनाममध्ये) एका ग्रंथालयात एक जुनी पोथी सापडली असून त्यात गणपतीच्या ६ रेखाकृती काढल्याचे आढळून आले आहे. हनोईतील एका मंदिरात विघ्नेश्वर असून तो कासवावर उभा आहे. मुकुट आणि कळस यांचा आकार कमळासारखा आहे.

स्वीडन येथील सिद्धीविनायक मंदिरातील श्री गणरायाची नयनमनोहारी मूर्ती (साभार : ‘स्वीडन गणेश टेम्पल’ संकेतस्थळ

३ अ. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये गणेशमूर्तीचे थाटात विसर्जन होणे : सिडनीपासून ‘स्टेनवेल पार्क बीच’ साधारणपणे ५० किलोमीटर अंतरावर आहे. तेथे गेल्या वर्षीपर्यंत ३ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तीचे विसर्जन अतिशय थाटात झाले. पॅसिफिक समुद्रात ढोल ताशांच्या गजरात गणेशभक्त गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. या भागात गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव भव्य स्वरूपात विविध कार्यक्रमांसह साजरा होतो. या काळात येथील वेंकटेश्वर मंदिर समितीचे अध्यक्षही या गणेशोत्सवात भाग घेतात. सिडनीतील हेलेन्सबर्ग येथे ५ सहस्रांहून अधिक लोक सोहळ्यात भाग घेतात.

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराजवळ असलेल्या ‘स्टेनवेल पार्क बीच’ येथे गणेशविसर्जनासाठी हिंदूंनी काढलेली मिरवणूक (साभार : ‘हफ पोस्ट ऑस्ट्रेलिया’)

३ आ. ब्रिटनमध्ये सहस्रो हिंदूंनी उत्साहात गणेशोत्सव साजरा करणे : ब्रिटनमध्ये ४ सहस्रांहून अधिक हिंदु बांधव गणेशोत्सव अतिशय थाटात साजरा करतात. तेथे ६ फुटापर्यंत गणेशमूर्तीचे विसर्जन ‘साऊथएंड ऑन सी’ परिसरात होते. अग्नीशमनदल आणि ग्रीनफोर्ड येथील जलाराम मंदिर यांच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाते. येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत गरबा नृत्य करत विसर्जन सोहळा पार पडतो. सिडनी (ऑस्ट्रेलिया), ब्रिटन आणि अमेरिका येथील गणेश सोहळ्यात अनेक प्रतिष्ठित नागरिक, ‘ॲटर्नी जनरल (महाअधिवक्ता)’, महापौर आदी सहभागी होतात. इंग्लंडच्या पूर्व किनार्‍यावर शूबरी येथेही गणेशोत्सव थाटात साजरा होतो.

‘हिंदु कल्चर अँड हेरिटेज सोसायटी’ यांच्या वतीने इंग्लंडमधील ‘हिंदु कौन्सिल’, लंडनमधील अग्नीशमन दल, तसेच ‘इस्कॉन’ यांच्या वतीने गेली २ वर्षे उत्साहात गणेशोत्सव पार पडल्याचे आढळून येते. इंग्लंडमधील थेम्स नदीतही उत्साहाने गणेशमूर्तींचे विसर्जन होते. तेथील अलेक्झांड्रा रोडवरील मंदिरातही गणेशोत्सव साजरा होतो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिका येथील गणेशोत्सवात पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काटेकोर पहाणी केली जाते.

कॅनडा व्हॅन्कूवर येथील श्री गणेशाच्या मंदिरातील ‘श्रीं’ची सुंदर मूर्ती ! (साभार : श्रीगणेशएबीसी डॉट कॉम” संकेतस्थळ)

३ इ. नेपाळमध्ये ८ व्या शतकापासून गणेशभक्ती प्रचलित असणे : नेपाळमध्ये ८ व्या शतकापासून गणेशभक्ती केली जात आहे. सम्राट अशोकची कन्या चारुमती हिने गणेश मंदिर बांधले आहे. तेथील एका भुर्जपत्रावर ‘नमो भगवते आर्यगणपतीहृदयाय’, असे लिहिले आहे. काठमांडूपासून ८ मैल अंतरावर भाटगाव असून तेथे हे गणेश मंदिर आहे. नेपाळमध्ये गणपतीला ‘सूर्यविनायक’ असेही म्हणतात. येथील सूर्यविनायक २ मूषकांवर बसलेला आहे.

३ ई. चीनमध्ये ५ व्या शतकापासून गणेशभक्ती चालू असणे : चीनमध्ये तुंगहॉनमधील लेण्यांच्या भिंतीवर गणेशमूर्ती आढळून येते. तेथे ५ व्या शतकापासून गणेशभक्ती चालू झाली. चिनी भिक्षु चुगण याने लिहिलेल्या पुस्तकात गणपतीचे वर्णन आढळून येते. कोबोदौची डाइनी यांनी गणपतीची प्रथम स्थापना चीनमध्ये केली. चारही दिशांचा रक्षक म्हणून प्रसिद्ध असलेला गणेश पुढे चीनप्रमाणेच गूढ विद्येचा स्वामी ठरला.

३ उ. श्रीलंका आणि ब्रह्मदेश येथे केली जाते गणेशभक्ती ! : श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून १५० मैलावर काटरगाव आहे. तेथील सुब्रह्मण्यम् मंदिरात गणपतीचे दर्शन घडते. श्रीलंकेत गणपति ‘पिल्लाईयार’ किंवा ‘गणदेंवियो’ या नावाने प्रसिद्ध आहे. वर्ष १०७० ते १११८ पासून येथे गणपति आढळून आले. ब्रह्मदेशातील म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये ६ व्या शतकापासून गणेशभक्ती केली जाते. म्यानमारमध्ये वर्ष १०४४ ते १०७७ या काळात गणपति आढळून आले. तेथे काही ठिकाणी नोव्हेंबरमध्ये पीकपाणी आल्यावरही गणपतीचा उत्सव केला जातो.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/610504.html

– श्री. सुनील वागळे (साभार : दैनिक ‘नवशक्ति’चा ‘श्रीगणेश विशेषांक’, (३.९.२००८)