(हिजाब म्हणजे डोके आणि मान झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र)
आपल्यापैकी बर्याच जणांना आपल्या आवडीच्या विषयाची निवड करता येते, तर बर्याच जणांना ती करता येत नाही. सध्या ‘हिजाब’ हा विषय यादृष्टीने वादग्रस्त ठरला आहे. काही मासांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब वापरण्यास बंदी घातली होती. त्यावरून मोठ्या प्रमाणात वादंग झाला होता. अनेक इस्लामी संस्थांना न्यायालयाचा हा निर्णय मान्य न झाल्याने त्यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. ती याचिका संमत होऊन न्यायालयाने या प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकार यांना स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.
काही महिलांवर हिजाब परिधान करण्याविषयी बळजोरी केली जात आहे. काही महिला स्वतःहून हिजाब धारण करतात, काही महिला नेहमीच हिजाब वापरतात, तर काही केवळ प्रार्थनेच्या वेळी तो परिधान करतात. काही महिला स्वतःच्या पंथाची ‘सांस्कृतिक ओळख’ म्हणून परिधान करतात, तर काही महिला त्यांच्या कुटुंबात पद्धत आहे; म्हणून हिजाब वापरतात. इस्लामने ‘हिजाब बंधनकारक आहे’, असे म्हटले आहे ? कि राजकीय इस्लामची ती एक निर्मिती आहे ? ते भक्तीचे प्रतिक आहे कि दडपशाहीचे ? असे काही वादग्रस्त; परंतु पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. त्यासाठीचा हा लेखप्रपंच….
१. हिजाब म्हणजे काय ?
‘हिजाब’ हा शब्द कुराणमध्ये ८ वेळा आला आहे. प्रत्येक वेळी त्याचा संदर्भ ‘दोन वस्तूंमधला पडदा’, असा आहे आणि यामागचे तत्त्व आध्यात्मिक आहे, कपड्याच्या शिलाईसंबंधी नाही. हिजाब हे विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीसह वागतांना सभ्यता आणि नम्रता यांचे प्रतीक आहे. हे तत्त्व महिला आणि पुरुष दोघांनाही लागू होते. यामागचे सर्वसाधारण कारण म्हणजे ‘सर्व मुसलमानांनी नम्रतेने वागावे, तसेच त्यांचा वेश सभ्यता दर्शवणारा असावा आणि महिला किंवा पुरुष यांच्या लैंगिकतेचे प्रदर्शन करणारा नसावा’, हे आहे.
२. हिजाबसंबंधीच्या नियमांवर पुरुषांची मक्तेदारी दिसून येणे
बहुतांश मुसलमान हिजाबविषयीचे नियम केवळ महिलांनाच लागू होतात, असे समजत आहेत. धार्मिक आणि इतिहासाची पुस्तके पाहिली, तर त्यामध्ये त्याचा जो अर्थ लावला जातो किंवा नियम वा कायदे दिलेले आहेत, यावर नेहमीच पुरुषांचे वर्चस्व आहे. यामध्ये विद्वान, बुद्धीमान आणि मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) यांचा समावेश आहे. हे सर्वजण स्वतःला इस्लामचे रक्षक आणि महिलांचे पालनपोषण करणारे समजतात. बहुतांश जणांनी त्यांना सोयीस्कर होईल, अशा रितीने या शब्दांचा अर्थ लावला आहे.
३. हिजाबविषयी इस्लामी देशांमध्ये मतमतांतरे असणे
हिजाबवरील साहित्यामध्ये पुष्कळ विविधता आहे. काही विद्वान म्हणतात की, हिजाब इस्लाम धर्माचा अगदी महत्त्वाचा भाग नाही. हिजाब वापरणे, हे इस्लामच्या ५ महत्त्वाच्या सूत्रांपैकी एक नाही. हिजाब वापरणे, हा प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे. जर महिलांनी हिजाब वापरणे बंधनकारक असते, तर त्याविषयी कुराणमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आला असता. वर्ष १९३६ मध्ये इराणवर राज्य करणार्या रेझा शहा पहलवी याने ‘महिलांनी बुरखा घालू नये’, असा फतवा काढला. तरीही ज्या महिला बुरखा वापरत असत, त्यांना मारहाण करण्यात येत असे. वर्ष १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामविषयक क्रांती झाली आणि महिलांना हिजाब वापरण्याची सक्ती करण्यात आली. ज्या महिला हिजाब घालत नव्हत्या, त्यांना मारहाण करून कारागृहात टाकले जात होते. वर्ष १९२४ मध्ये तुर्की देशातील नेता मुस्तफा केमल आतातूर याने सार्वजनिक संस्थांमध्ये महिलांनी हिजाब घालण्यावर बंदी घातली; परंतु त्यानंतर रेसेप तय्यप एर्दाेगान याने ही बंदी रहित केली. अशा प्रकारे हिजाबवर बंदी घालणे आणि ती बंदी उठवणे, हे जगात विविध ठिकाणी चालू राहिले.
४. इस्लाममध्ये महिलांनी वस्त्राने अंग झाकण्याचे विविध प्रकार
इस्लाममध्ये महिलांनी वस्त्राने अंग झाकण्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत.
अ. ‘खिमार’ या प्रकारामध्ये डोके, मान आणि खांदे यांवर वस्त्र घेतले जाते.
आ. ‘बुरखा’ या प्रकारामध्ये सर्व शरीर वस्त्राने झाकले जाते.
इ. ‘नकाब’ म्हणजे केवळ चेहराच वस्त्राने झाकला जातो.
ई. ‘चादर’ या प्रकारामध्ये डोळे सोडून इतर सर्व शरीर वस्त्राने झाकले जाते.
उ. आणखी एका प्रकारामध्ये डोके आणि मान वस्त्राने झाकली जाते.
यांपैकी डोके आणि मान यांवर घातल्या जाणार्या वस्त्राला जगातील बहुतांश ठिकाणी ‘हिजाब’ म्हटले जाते. बहुतांश मुसलमान महिलांमध्ये राष्ट्रीयता, सामाजिक स्थान, आर्थिक दर्जा आणि धार्मिक विश्वास या दृष्टीकोनातून हिजाब वापरला जातो.
५. इस्लामी राष्ट्रांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून हिजाबच्या वापराविषयी समाजाची मानसिकता लक्षात येणे
वर्ष २०१४ मध्ये ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेकडून ६ मुसलमानबहुल राष्ट्रांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. ‘महिलांनी कोणती वस्त्रे वापरावीत ? याविषयी त्यांना अनुमती देण्यात यावी का ?’, हा या सर्वेक्षणाचा विषय होता. यावर ट्युनेशियामध्ये ५६ टक्के, तुर्कीयेमध्ये ५३ टक्के, लेबेनॉनमध्ये ४९ टक्के, सौदी अरेबियामध्ये ४७ टक्के, इराकमध्ये २७ टक्के आणि पाकिस्तानमध्ये २२ टक्के या प्रमाणात तेथील लोकांनी ‘होय’ असे उत्तर दिले. या आकडेवारीवरून त्या देशांमध्ये असलेल्या समाजाविषयीची कल्पना येते.
६. हिजाबकडे बघण्याचा दृष्टीकोन शिक्षण आणि सभोवतालचे वातावरण यांवर अवलंबून असणे
वर्ष २०१५ मध्ये इराणमध्ये ‘हिजाब वापरणे बंधनकारक आहे कि नाही ?’, याविषयी जनमत कौल घेण्यात आला. याला प्रतिसाद देणार्यांचे त्यांच्या ‘शैक्षणिक पात्रतेनुसार आणि मानवी विकासाच्या दृष्टीने ते कुठे आहेत ?’, या दृष्टीकोनातून वर्गीकरण करण्यात आले. उच्चशिक्षित महिलांपैकी ५१ टक्के महिलांनी ‘हिजाब वापरणे बंधनकारक नाही’, असे उत्तर दिले, तर उच्चशिक्षित नसलेल्यांपैकी ६१ टक्के महिलांनी ‘हिजाब वापरणे बंधनकारक असावे’, असे सांगितले. मानवी विकासाच्या दृष्टीने विकास झालेल्या भागांमध्ये ‘हिजाब बंधनकारक नाही’, तर अविकसित भागांमध्ये ‘हिजाब बंधनकारक आहे’, असे सांगण्यात आले. त्यामुळे हिजाबकडे बघण्याचा दृष्टीकोन शिक्षण आणि सभोवतालचे वातावरण यांवर अवलंबून आहे, हे दिसून येते.
७. हिजाब परिधान करण्यासाठी समाजाचा मुसलमान महिलांवर दबाव असणे
मुसलमानांच्या काही समाजामध्ये महिलांना हिजाब घालावा लागतो; कारण त्यांचा सभोवतालचे लोक हिजाबचा आग्रह धरतात आणि हिजाब न घातल्यास निंदा करतात. ‘हिजाबविना महिला म्हणजे उघड्यावर ठेवलेले मांस, आवरण नसलेली कँडी आणि आवरणाविना असलेले मोती’, असे या समाजात म्हटले जाते. ‘धार्मिकेतेचे प्रदर्शन करण्यासाठी हिजाब वापरला जातो’, असेही म्हटले जाते.
८. ‘पाश्चिमात्य संस्कृतीमधील अडथळा आणि देशाची सुरक्षितता’, या दृष्टीकोनातून पाश्चिमात्य देशांनी हिजाबवर बंदी घालणे
काही देशांमध्ये देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने विचार केला जातो. बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये हिजाबकडे ‘समांतर समाज किंवा संस्कृतीमध्ये निर्माण होणारा अडथळा’, या दृष्टीकोनातून पाहिले जाते. ‘जर मुसलमान आमच्या देशात रहातात, तर त्यांनी आमच्याप्रमाणे रहावे आणि दिसावे’, अशी पाश्चिमात्य देशातील लोकांची धारणा आहे. मुसलमानांनी त्यांच्या देशाप्रमाणे वेश आणि तेथील संस्कृतीचे पालन करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हिजाबमुळे प्रश्न निर्माण होतो. चेहरा झाकलेला असेल, तर एखाद्या व्यक्तीला ओळखणे कठीण जाते. त्यामुळे अनेक पाश्चिमात्य देशात हिजाब वापरणे धोकादायक समजले जाते. याचा परिणाम म्हणून १२ युरोपीयन देशांमध्ये या ना त्या पद्धतीने हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे. फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि स्विर्त्झलँड या देशांत सर्व प्रकारच्या हिजाबवर पूर्णपणे बंदी आहे. जर्मनी, स्पेन, इटली, डेन्मार्क, लॅटविया, बोस्निया आणि हेजेगोविना या देशांमध्ये ही बंदी मर्यादित स्वरूपात आहे. या सर्व देशांचे म्हणणे आहे की, हिजाबला जगात कोणतेही स्थान नाही. याविषयी टीका करणारे याला ‘इस्लामविषयीची भीती किंवा तिरस्कार’, असे नाव देतात. लंडन, व्हिएना, पॅरिस आणि बर्लिन या ठिकाणी हिजाब घातलेल्या मुसलमान महिलांवर आक्रमण करून त्यांचा हिजाब फाडण्यात आला, अशा प्रकारच्या घटनांचे दाखले ते देतात.
पाश्चिमात्य देशात रहाणार्या मुसलमान महिला त्यांच्या धर्माची ओळख आणि सांस्कृतिक एकता, ही हिजाब घालण्याची कारणे सांगतात. यामुळे काही आस्थापने आपल्या विज्ञापनांमधून हिजाबला प्रसिद्धी देत आहेत. ‘गॅप्स २०१८’ या आस्थापनाद्वारे केलेल्या ‘बॅक टू स्कूल’ (पुन्हा शाळेत चला !) या मोहिमेत हिजाब घातलेल्या एका मुलीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘नायके’ या ‘ऑनलाईन’ कपडे विक्री करणार्या आस्थापनाकडून हिजाबची विक्री करण्यात येते.
९. हिजाबच्या सक्तीमुळे जगभरातील सहस्रो मुसलमान महिलांवर अन्याय होणे
दुसरीकडे आपण सहस्रो मुसलमान महिलांचा विचार केला, तर हिजाब हा त्यांच्यासाठी पर्याय नसून त्यांच्यावर तो घालण्याची सक्ती करण्यात येते. हिजाब न घातल्यास या महिलांना शिक्षा करण्याची भीती दाखवली जाते. ज्या महिला हिजाब वापरत नाहीत, त्यांना काही पदे दिली जात नाहीत. काही वेळा हिजाब घातला नाही; म्हणून महिलांची हत्या करण्यात आली आहे. काही घटनांमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हिजाब न घालणार्या महिलांची हत्या होते, काही ठिकाणी त्यांच्या पालकांकडून त्यांची हत्या होते, तर काही ठिकाणी आतंकवाद्यांकडून त्यांची हत्या केली जाते. जगात मोठ्या प्रमाणात इस्लामच्या गटाचा दबाव वाढवण्यासाठी आणि महिलांवर बंधन आणण्यासाठी हिजाबचा उपयोग केला जात आहे. वर्ष २०१७ मध्ये इराणमधील काही महिलांनी हिजाब न घालण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याविषयी निदर्शने केली. इराण सरकारने यावर सक्त कारवाई करत ४० हून अधिक महिलांना अटक करत बर्याच महिलांना दंड आकारण्यात आला. त्यामुळे ही चळवळ बंद पडली. इराणमध्ये महिलांवर अत्याचार चालूच आहेत. हिजाब घातला किंवा घातला नाही, तरी तेथील मुसलमान महिलांवरील आक्रमणे चालूच आहेत.
हिजाबमुळे झालेले धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय युद्ध यांचे परिणाम मुसलमान महिलांना भोगावे लागत आहेत. हिजाबवरील धार्मिक बंधन काढल्यास तो केवळ एक कापडाचा तुकडा आहे. जर एखाद्या महिलेला हिजाबमुळे स्वतःची ओळख आहे, असे वाटते, तर तिने तो परिधान करावा आणि जर एखाद्या महिलेला नको असेल, तर तिने तो घालू नये, असे प्रत्यक्षात हवे. हे शक्य आहे; पण ते होत नाही; कारण ‘धार्मिक कपडे, गर्भपात करणे, एकटे रहाणे, पुरुषांशी मैत्री असणे, स्वतःचा जोडीदार निवडणे आदी विषयांमध्ये महिलांनी काय करायचे ? हे आम्ही ठरवणार’, असे जगाला वाटते.
– पल्की शर्मा उपाध्याय, माजी वृत्तनिवेदिका, WION
(साभार : ‘WIONews’चे संकेतस्थळ)