अमरावती येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ४३५ किलो गांजा पकडला, ४ जणांना अटक !

७४ लाख २० सहस्र रुपयांचा माल जप्त !

अमरावती – जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेतील गोपनीय पथकाने ३ सप्टेंबर या दिवशी सकाळी ट्रकमधून वाहून नेला जात असलेला तब्बल ५२ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. वृषभ पोहोकर (वय २५ वर्षे), विक्की युवनाते (वय २० वर्षे), शेख अरबाज शेख इलियास (वय १९ वर्षे) आणि शेख तौसिफ शेख लतीफ (वय १९ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक आणि २ कार यांसह एकूण ७४ लाख २० सहस्र ६०० रुपयांचा माल जप्त करून तो आरोपींसमवेत चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या कह्यात दिला आहे.

वरील ४ आरोपी आंध्र प्रदेशातून पांढरकवडा-यवतमाळ-बाभूळगाव-चांदूर रेल्वे मार्गे अमरावती, अशी ट्रकमधून गांजाची वाहतूक करत होते. पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी नाकाबंदी करून पथकाद्वारे वाहन थांबवले. तेव्हा ट्रकमधील रिकाम्या प्लास्टिक क्रेटखाली खोकी आणि पोती यांमधून ५२ लाख २० सहस्र ६०० रुपयांचा गांजा आढळला. या ट्रकसह पोलिसांनी २ कारही कह्यात घेतल्या आहेत.