पिंपरी (पुणे) – गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सवांच्या काळात शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी गर्दी करतात. त्या वेळी खासगी वाहनचालक, खासगी ट्रॅव्हल्स आस्थापने नागरिकांच्या परिस्थितीचा अपलाभ घेत अधिक दराने (दुप्पट दराने) तिकीट विक्री करतात. बर्याच प्रवाशांनी याविषयी तक्रारी नोंद केल्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने शहरातील २७ वाहनांची पडताळणी केली, तसेच अधिक पैसे घेणारी वाहने आणि बुकिंग स्टॉलवर (तिकीट घर) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या गाडीच्या तिकीटापेक्षा दीडपट भाडेवाढ खासगी वाहन आकारू शकतात; मात्र याहून अधिक भाडे आकारणार्या वाहनांवर आणि तिकीट घरांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करू शकतो. पिंपरी-चिंचवड शहराचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, ‘‘नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीच्या दरात वाढ होत असेल, तर त्या वाहनांचा परवाना रहित केला जाऊ शकतो. यविषयी कुणाची तक्रार असेल, तर उपप्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधावा. आमची पडताळणी मोहीम चालूच आहे.’’