राजकीय लाभासाठी निवडणुकीत हातमिळवणी करणे वेगळे आणि एखाद्या पक्षाशी निष्ठा ठेवून त्याचे पाईक होणे वेगळे. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याने देशभरातील अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. हा पाठिंबा केवळ राजकीय लाभासाठी होता. सत्ता गेल्यानंतर अनेक पक्षांनी काँग्रेसशी काडीमोड घेतला; परंतु सत्ता असो वा नसो, काँग्रेसला आणि गांधी घराण्याला मानणारा एक मोठा वर्ग देशभरात अस्तित्वात होता; मात्र दिवसेंदिवस निष्ठावंत समजला जाणारा हा वर्ग काँग्रेसपासून दुरावत चालला आहे, असे लक्षात येते. नुकतेच काँग्रेस पक्षाचे त्यागपत्र देणारे गुलाम नबी आझाद हे याचे अलीकडील उदाहरण आहे. आझाद यांनी काँग्रेसचे केवळ त्यागपत्रच दिले नाही, तर त्यागपत्र देतांना ‘काँग्रेस पक्ष अस्तित्वहीन झाला आहे. पक्षात काहीच राहिलेले नाही. यापुढे पक्षाचे काही भले होईल, असे वाटत नाही. आता काँग्रेसचे अध्यक्षपद कुणाकडेही गेले, तरी काही फरक पडण्याची शक्यता नाही’, असे जाहीर वक्तव्य करून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसमधील निष्ठावंतांपैकी आझाद हे एक होते. आझाद हे काँग्रेसच्या ‘वर्किंग कमिटी’चे म्हणजे ‘हाय कमांड’च्या समितीचे सदस्य होते. राज्यसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते हे महत्त्वाचे पद त्यांनी भूषवले आहे. विशेष म्हणजे या ज्येष्ठ आणि गांधी घराण्याशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या नेत्याला पक्षाला सोडचिठ्ठी देतांना ना पक्षश्रेष्ठींनी रोखले, ना त्यांना काँग्रेसच्या अन्य कुणी नेत्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
मानहानीकारकरित्या पक्षत्याग करायची वेळ आलेले आझाद हे काही काँग्रेसचे पहिलेच निष्ठावंत नाहीत. यापूर्वी काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधी यांनी अवमानकारक वागणूक दिल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आसामचे विद्यमान मुख्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे निष्ठावंत काँग्रेस नेते हेमंत बिस्वा सरमा हे राहुल गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते. सरमा त्यांच्या समस्या राहुल गांधी यांच्यापुढे पोटतिडकीने मांडत असतांना राहुल गांधी मात्र त्यांच्या ‘पीडी’ नावाच्या कुत्र्याला बिस्किट भरवण्यात मग्न होते. सरमा यांच्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही, असा दावा सरमा यांनी स्वत: केला होता. या अपमानजनक वागणुकीमुळे सरमा यांनी थेट अमित शहा यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. काही मासांपूर्वी झालेल्या आसामच्या विधानसभा निवडणुकीत सरमा यांनी भाजपच्या वतीने प्रचार करून आसाममध्ये भाजपला सत्ता मिळवून दिली. राहुल गांधी यांच्या एका कृतीमुळे काँग्रेसला तिच्या हातातील एक राज्य सलग दुसर्या निवडणुकीच्या वेळीही गमवावे लागले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी काही मासांपूर्वी काँग्रेस ‘घरापुरती मर्यादित झाली असल्या’ची टीका केली. राहुल गांधी यांच्याविषयी असंतोष व्यक्त करूनही त्यांनी ‘काँग्रेससाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करीन’, असे सांगून गांधी घराण्याशी असलेली निष्ठा दाखवून दिली; परंतु राहुल गांधी यांनी त्यांच्याशी ज्येष्ठतेचा आदर न राखल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षच सोडून दिला. ३ वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे गुजराती समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काही मासांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देतांना राहुल गांधी यांना नेत्यांपेक्षा भ्रमणभाषमध्ये अधिक रस असल्याचे ट्वीट केले. काही मासांपूवी काँग्रेसच्या काही निष्ठावान नेत्यांनी काँग्रेसची होत असलेली दुरवस्था न पाहून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोनिया गांधी यांनी हाती घ्यावी, असे पत्र त्यांना लिहिले. या मागणीमागील त्यांची पक्षहिताची भूमिका न पहाता राहुल गांधी यांनी या सर्वांच्या निष्ठेविषयीच शंका उपस्थित केली. त्यामुळे या सर्व निष्ठावंतांनी खेद व्यक्त केला. त्यांनी अद्यापपर्यंत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही, हेच काय ते आता शिल्लक आहे.
आझाद यांच्या टीकेवर प्रत्युत्तर नाही !
काँग्रेसचे नेते किंवा प्रवक्ते यांपैकी कुणीही आझाद यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिल्याचे ऐकिवात नाही. याचे कारण आझाद यांनी मांडलेली काँग्रेसची वस्तूस्थिती काँग्रेसच्या सर्व नेत्यांनाही मान्य आहे. त्यामुळे ही नेतेमंडळी भविष्यात पक्षासाठी किती योगदान देतील ? हा प्रश्नच आहे. पक्षश्रेष्ठींना सल्ला दिल्याचा काय परिणाम होतो, हे काँग्रेसच्या नेत्यांनी आझाद, कपिल सिब्बल यांच्या उदाहरणांतून पाहिले आहे. त्यामुळे ‘पक्षश्रेष्ठींना सल्ला देण्यापेक्षा काँग्रेसची वाताहात पहात रहाण्यातच शहाणपणा आहे’, हे काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या आता ध्यानात आले आहे.
पुण्याईच्या बळावर किती दिवस टिकणार ?
काँग्रेसमधील एक मोठा वर्ग स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झाला होता. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल आदी थोर नेत्यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली आहे. तत्कालीन काँग्रेस हा राष्ट्रवादाचा चेहरा होता; परंतु त्यानंतर गांधी, नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस ही मुसलमानधार्जिणी होत गेली, ती वस्तूस्थिती आहे. काँग्रेसने देशात इतका काळ सत्ता भोगली, ही काँग्रेसमधील तत्कालीन नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाची पुण्याई होती; मात्र ही पुण्याई काँग्रेसच्या पुढील नेतृत्वाला टिकवून ठेवता आली नाही. त्यामुळे ‘भाजप काँग्रेसला संपवेल’, असे म्हणण्यापेक्षा ‘काँग्रेसला संपवण्यासाठी राहुल गांधी हेच पुरेसे आहेत’, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. इंदिरा गांधी यांनी फिरोज खान यांच्याशी विवाह केल्यानंतर मोहनदास गांधी यांनी फिरोज खान यांना मानसपुत्र मानून स्वत:चे आडनाव दिले. त्यामुळे इंदिरा यांच्या नावापुढेही ‘गांधी’ हे आडनाव आले. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे नेहरू आणि गांधी घराण्याची छाप भारतियांवर होती; मात्र काँग्रेसमधील निष्ठावंतांनीच उघडपणे गांधी घराण्याविषयी चालू केलेला असंतोष ही भारतियांमधील ‘नेहरू’, ‘गांधी’ या घराण्यांविषयीची निष्ठा संपुष्टात येत असल्याची चिन्हे आहेत !
निष्ठावंतांनी काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी दाखवलेला अविश्वास हा गांधी घराण्याची विश्वासार्हता संपुष्टात आल्याचे लक्षण ! |