प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून देण्यासाठीचा उपक्रम राबवणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र  

दीपक केसरकर

सिंधुदुर्ग – राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले, तर ते अधिक चांगले होणार आहे. या बोली भाषेच्या माध्यमातूनच मग त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेल्यास त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होईल. त्यामुळे अशा प्रकारे स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पुस्तकांची निर्मिती ‘जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थे’च्या म्हणजे ‘डाएट्’च्या  (डिस्ट्रीक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आणि ट्रेनिंगच्या) वतीने करण्यात यावी, अशी सूचना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित केलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीच्या वेळी केली.
या बैठकीला कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, रत्नागिरी ‘डाएट्’चे प्राचार्य गजानन पाटील, रत्नागिरी जिल्ह्याचे माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग ‘डाएट्’च्या प्राचार्य अनुपमा तावशीकर,  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.
या वेळी मंत्री केसरकर यांनी, ‘मुलांचा कल इयत्ता ८ वीपासूनच ठरवण्यात यावा. मुलांना प्राथमिक शिक्षण घेतांनाच व्यावसायिक शिक्षणाविषयी गोडी निर्माण करता आली पाहिजे. त्यांना स्थानिक भाषेतून शिक्षण दिले पाहिजे. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे, ही काळाची आवश्यकता आहे. असे सुप्त गुण हेरून त्यावर शिक्षकांनी काम केले पाहिजे. त्यासाठी एक प्रकल्प सिद्ध करण्यात यावा. हा प्रकल्प राज्यभर राबवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल, याचा अभ्यासही करावा’, अशा सूचना दिल्या.