शीव (मुंबई) येथील तलावात घरगुती, तर चौपाटी आणि माहीम रेती बंदर येथे सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करावे – मुंबई महापालिका

मुंबई – शीव, चुनाभट्टी इत्यादी नजीकच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असतात. तथापि तलावाची मर्यादा लक्षात घेऊन यंदाच्या गणेशोत्सवापासून या तलावात मोठ्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, अशी विनंती ‘एफ् उत्तर’ विभागाचे साहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी केली आहे. शीव परिसरात असणार्‍या एन्.एस्. मंकीकर मार्गालगत हा तलाव आहे. येथे मूर्तीविसर्जन सुविधा रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. मोठ्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन दादर चौपाटी आणि माहीम रेतीबंदर येथे करावे, असेही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईत वाहतूक नियमनासाठी १० सहस्र ६४४ पोलीस

गणेशोत्सवा वेळी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी १० सहस्र ६४४ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यात पोलीस अधिकारी आणि अंमलदार, होमगार्ड, ट्राफिक वॉर्डन, नागरी संरक्षण दल, एन्.एस्.एस्., आर्.एस्.पी. यांचा सहभाग आहे. या कामात वाहतूक पोलिसांना मदत करण्याकरता वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटना उदा. वॉटर सेफ्टी पेट्रोल इत्यादी यांचा समावेश आहे. विसर्जनाच्या काळात वाहने बंद पडून येणारा अडथळे अथवा विसर्जनाच्या मार्गात येणारे अन्य अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून लहान आणि मोठ्या क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेशभक्तांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्राथमिक उपचार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत.