गोव्यात घातक अमली पदार्थाची (‘डिझाईनर ड्रग्स’ची) निर्मिती होत असल्याची माहिती उघड

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर गोव्याचे नाव पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त !

पणजी – गोव्याचे नाव ‘अमली पदार्थ व्यवसायाचे एक मुख्य ठिकाण’, असे  आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त झालेले आहे. अभिनेत्री तथा भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर गोव्यात घातक अमली पदार्थांची (‘डिझाईनर ड्रग्स’ची) निर्मिती होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

विविध रसायनांमधून सिद्ध केलेल्या अमली पदार्थाला वैद्यकीय भाषेत ‘डिझाईनर ड्रग्स’, असे संबोधले जाते. ‘डिझाईनर ड्रग्स’ची निर्मिती गोव्यात होत असते आणि यासाठी लागणारी रसायने रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांतून गोव्यात आणली जातात. ‘डिझाईनर ड्रग्स’ सिद्ध करण्यासाठी लागणार्‍या रसायनांना सहजपणे कोणताही आकार देता येतो. भारतात ‘क्रॉकरी’ आणि विविध कलाकृती यांची आयात होत असते. ‘क्रॉकरी’ आणि विविध कलाकृती म्हणजेच ‘डिझाईनर ड्रग्स’ सिद्ध करण्यासाठीची रसायने आहेत. ‘क्रॉकरी’ आणि विविध कलाकृती यांना रंगवल्याने ही रसायने असल्याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही. गोव्यात ही रसायने आल्यावर ती धुवून काढून मूळ रसायने त्यातून मिळवली जातात. ‘डिझाईनर ड्रग्स’ सिद्ध करण्यासाठी विदेशातील रसायन तज्ञांची साहाय्यता घेतली जाते. ‘डिझाईनर ड्रग्स’ हे ‘नाईट पार्ट्यां’मध्ये वापरण्यात येणार्‍या अमली पदार्थापासून निराळे असून ते घातक आहेत. याचे सेवन केल्यास सेवन करणार्‍याचा त्वरित मृत्यू होऊ शकतो. हे अमली पदार्थ घातक असूनही त्याची तस्करी राज्यापुरती मर्यादित नसून त्याची व्याप्ती मोठी आहे आणि युवावर्ग याचे ग्राहक आहेत.

गोव्यातील अमली पदार्थाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी कृती दल निर्माण करण्याच्या सिद्धतेत ! – जस्पाल सिंह, पोलीस महासंचालक

गोव्यातील अमली पदार्थाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी कृती दल निर्माण करण्याची सिद्धता गोवा पोलिसांनी केली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिली. पोलीस महासंचालक जसपाल सिंह म्हणाले, ‘‘कृती दलामध्ये चांगल्या पोलीस अधिकार्‍यांचा समावेश केला जाणार आहे.’’ कृती दल सर्वप्रथम अमली पदार्थाचे जाळे नष्ट करू शकते आणि नंतर गोवा अमली पदार्थ मुक्त करू शकते, असे मत एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने व्यक्त केले.

संपादकीय भूमिका 

असे प्रयत्न आतापर्यंत अनेक वेळा झाले; पण हा घातक व्यवसाय वाढतच आहे, तरीही ‘सनबर्न’सारखे संगीत डान्स कार्यक्रम ज्यातून अमली पदार्थ व्यवसायाला तेजी येते असे कार्यक्रम असंस्कारित पर्यटकांसाठी आयोजिक केले जातात, हे दुर्दैव !