तन-मन-धन अर्पून गुरुसेवा करणारे प.पू. भक्तराज महाराज यांचे नगर येथील अनन्य भक्त (कै.) शरद मेहेर (वय ६९ वर्षे) !

२१.८.२०२२ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे नगर येथील भक्त शरद मेहेर (वय ६९ वर्षे) यांचे पुणे येथे निधन झाले. ३०.८.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्त प.पू. बाबांच्या भक्तांना शरद मेहेर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. श्री. शरद रामकृष्ण बापट (अध्यक्ष, श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, वय ७७ वर्षे), इंदूर आणि श्री. गिरीश दीक्षित (वय ६२ वर्षे), नाशिक

१ अ. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज या दोघांचाही सहवास लाभलेले शरद मेहेर ! : ‘शरद मेहेर यांचे वडील कृष्णाजी चिमाजी मेहेर उपाख्य दादा हे प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे भक्त होते. प.पू. बाबा असतांना दादा कांदळी (जिल्हा पुणे) येथील श्रीराम मंदिरात येत असत. तेव्हा त्यांच्या समवेत शरद मेहेरही येत असत. शरद मेहेर यांना प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज (प.पू. दादा) या दोघांचाही सहवास लाभला. शरद मेहेर यांनी त्यांच्या समवेत भ्रमणही केले होते.

१ आ. मोरटक्का आणि कांदळी येथील आश्रमांच्या बांधकामाच्या कार्यात समर्पित भावाने सेवा करणे : मोरटक्का (मध्यप्रदेश) आश्रमातील प.पू. सद्गुरु श्री अनंतानंद साईश यांच्या पादुकामंदिराचे बांधकाम चालू असतांना त्यांनी तिथे पूर्णवेळ राहून देखरेख केली. कांदळी येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीमंदिराचे बांधकाम गोवा येथील श्री. वागळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू होते. तेव्हा शरद मेहेर श्री. वागळे यांच्या समवेत कांदळी येथेच राहिले. या दोन्ही आश्रमांच्या सेवेत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अक्षरशः काळ-वेळ न बघता तन-मन-धनाने निःस्वार्थीपणे आणि एकनिष्ठपणे सेवा केली. त्यांच्या सेवेला तोड नाही.

ते सतत हसतमुख, कर्तव्यदक्ष आणि सगळ्यांच्या साहाय्यास सदैव तत्पर असायचे. असे परम भक्त प.पू. बाबा आणि प.पू. दादा यांच्या श्री चरणी लीन झाले. त्यांना विनम्र श्रद्धांजली !’

२. डॉ. विठ्ठल माधव पागे (वय ८१ वर्षे), इंदूर

२ अ. प.पू. भक्तराज महाराज यांचे अनन्य आणि एकनिष्ठ शिष्य शरद मेहेर ! : ‘आदरणीय सद्भक्त शरदराव मेहेर हे प.पू. भक्तराज महाराज यांचे अनन्य आणि एकनिष्ठ शिष्य होते. माझा आणि त्यांचा निकट संबंध पुष्कळ वेळा आला. त्यांनी कांदळी (पुणे), मोरटक्का (मध्यप्रदेश) आणि इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्तवात्सल्याश्रम या तीनही आश्रमांच्या बांधकामांसाठी १-२ मास राहून तन-मन-धनपूर्वक सेवा केली आहे.

२ आ. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामजीदादा यांच्या शिष्य प्रभावळीतील शरदराव मेहेररूपी हिरा निखळला ! : ‘शांत आणि श्रद्धाशील’, अशी दैवी संपत्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडून लाभली होती. आदरणीय श्रीमती सरितावहिनी (पत्नी) आणि श्री. सौरभ (मुलगा) हे अत्यंत श्रद्धावंत भक्त आहेत. त्यांचा आणि माझाही अनेकदा संबंध आला आहे. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज या दोघांच्याही चरित्राच्या लेखनकाळात मी इंदूर आणि मोरटक्का आश्रमात राहिलो होतो. तेव्हा शरदभैय्याही माझ्या समवेत होते. त्यांची प.पू. रामानंद महाराज यांच्यावरील निष्ठाही असामान्य होती. आज त्यांना श्रद्धांजली वहातांना माझ्या डोळ्यांत आसवे दाटून आली. मला अनेक प्रसंग आठवतात. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामजीदादा यांच्या शिष्य प्रभावळीतील एक मेहेररूपी हिरा निखळला आहे. हरि ॐ तत्सत् ।’

३. श्री. भास्कर वागळे (वय ७६ वर्षे), पणजी, गोवा.

‘शरद मेहेर म्हणजे एक हसरे, सकारात्मक आणि नेहमी इतरांना साहाय्य करणारे व्यक्तीमत्त्व होते. कांदळी (जिल्हा पुणे) आणि मोरटक्का (मध्यप्रदेश) येथील आश्रम आणि इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्तवात्सल्याश्रम येथील प्रत्येक भंडार्‍याला त्यांची आवर्जून उपस्थिती असायची. प.पू. बाबांच्या वेळेपासून ते आश्रमाशी जोडले गेले होते. प.पू. बाबांनाही ते फार जवळचे होते.

३ अ. प.पू. बाबांनी देहत्याग केल्यावर ‘प.पू. बाबा आणि प.पू. रामानंद महाराज (प.पू. दादा) एकच आहेत’, अशी खूण त्यांना पटणे अन् तेव्हा ‘आता प.पू. दादांना सोडायचे नाही’, असे त्यांनी ठरवणे : प.पू. बाबांनी देहत्याग केल्यावर शरद मेहेर यांना फार मोठी पोकळी जाणवू लागली. ते हताश झाले होते; पण एकदा ते प.पू. दादांकडे (प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्याकडे) पैसे अर्पण करायला गेले होते. तेव्हा प.पू. बाबा ज्या पद्धतीने त्यांच्या पाकिटामध्ये पैसे ठेवायचे, अगदी त्याच पद्धतीने प.पू. दादांनी त्यांच्या पाकिटात पैसे ठेवले आणि प.पू. बाबा जसे बोलायचे, तसेच ते काहीतरी बोलले. तेव्हा त्यांना ‘प.पू. बाबा आणि प.पू. दादा एकच आहेत’, याची खूण पटली. तेव्हाच त्यांनी ‘आता प.पू. दादांना सोडायचे नाही. त्यांच्यापासून दूर रहायचे नाही’, असे ठरवले.

३ आ. प.पू. दादांच्या समवेत सातत्याने गाडी घेऊन फिरणे आणि त्या वेळी भ्रमणभाषवरून स्वतःचा व्यवसाय सांभाळणे : ते प.पू. दादांच्या समवेत सतत गाडी घेऊन फिरायचे. नगरची गुरुपौर्णिमा झाली. तेव्हाही ते सतत प.पू. दादांच्या समवेत होते. नगरची गुरुपौर्णिमा झाल्यावर ते प.पू. दादांच्या समवेत परत इंदूरला गेले. ते त्यांची सर्व कामे भ्रमणभाषवरून करायचे. ते म्हणायचे, ‘‘मी प.पू. दादांच्या समवेत फिरत असतांनाही भ्रमणभाषवरून माझा व्यवसाय मस्त चालला आहे.’’ त्यांची पत्नी सरिता हिने एकटीने सगळे सांभाळले.

३ इ. शरद मेहेर यांचे प.पू. बाबांच्या तिन्ही आश्रमांच्या कामात फार मोठे योगदान आहे.

३ ई. कांदळी येथील समाधीमंदिराच्या निर्माणकार्याच्या वेळी शरद मेहेर यांच्याशी मैत्री होणे : कांदळी येथील समाधीमंदिराच्या निर्माणकार्याच्या वेळी ३ – ४ मास आम्ही एकाच खोलीत एकत्र रहात होतो. त्यामुळे माझी त्यांच्याशी अधिक जवळीक झाली. तेव्हा त्यांच्याकडे गाडी होती आणि ते अडी-अडचणीला कोणतेही काम करायला तत्पर असायचे. त्यामुळे मला एक हक्काचा सहकारी मित्र मिळाला आणि त्यांनी ती मैत्री छान निभावली.

३ उ. सकारात्मक : त्यांना पुष्कळ शारीरिक समस्या होत्या; पण त्यांनी तसे कधी जाणवू दिले नाही. ते नेहमी सकारात्मक असायचे. काहीही झाले, तरी ते त्याविषयी हसूनच सांगायचे.

त्यांच्या निधनाने मी माझा अगदी जवळचा आणि चांगला मित्र गमावला आहे.’

४. श्री. विनीत निकम, पुणे

४ अ. वडिलांच्या समवेत प.पू. बाबांकडे येणे आणि त्यानंतर प.पू. बाबांकडून गुरुमंत्र मिळणे : ‘प.पू. बाबा आणि प.पू. दादा यांचे निकटचे अन् आवडते भक्त आणि शिष्य, म्हणजे शरद कृष्णाजी मेहेर ! हे मूळचे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील होते. त्यांचा जन्म ६.१२.१९५२ या दिवशी झाला. ते त्यांचे वडील कृष्णाजी चिमाजी मेहेर उर्फ दादा मेहेर यांच्या समवेत वर्ष १९८६ – ८७ मध्ये प.पू. बाबांकडे आले. वर्ष १९८८ मध्ये त्यांना प.पू. बाबांकडून गुरुमंत्र मिळाला.

४ आ. प.पू. बाबांच्या देहत्यागानंतर शरद मेहेर यांनी प.पू. दादांना पुष्कळ साथ देणे आणि प.पू. दादांनी त्यांना ‘सेक्रेटरी’ (सचिव) संबोधणे : प.पू. बाबांच्या देहत्यागानंतर शरद मेहेर यांनी प.पू. रामजीदादांना पुष्कळ साथ दिली. प.पू. दादा त्यांना आपले ‘सेक्रेटरी’ (सचिव) संबोधत असत. एका भंडार्‍यानिमित्त इंदूरला गेले असतांना प.पू. दादांनी शरद मेहेर यांना आणि मला भंडार्‍यापूर्वी ४ – ५ दिवस मोरटक्का आश्रमातील सिद्धता आणि इतर व्यवस्था पहाण्यासाठी पाठवले होते.

४ इ. मोरटक्का आश्रमात तुंबलेला ‘सेप्टीक टँक’ शरद मेहेर यांनी स्वतः टाकीत उतरून स्वच्छ करणे : मोरटक्का आश्रमाची सर्व व्यवस्था पहात असतांना आम्हाला तेथील सर्व शौचालये तुंबलेली दिसली. त्यांचा मुख्य ‘सेप्टीक टँक’ तुंबलेला आढळला. तो उपसण्यासाठी लागणारा ‘पंप’ आणि ‘टँकर’ जवळच्या २ शहरांत (बडवाह आणि सनावद येथे) पुष्कळ शोधूनही मिळाला नाही. त्या वेळी कोणताही विचार न करता शरद यांनी स्वतः त्यातील घाण (मैला) बालदीने उपसली. अर्धी टाकी रिकामी झाल्यावर ते स्वतः त्या टाकीत उतरले आणि त्यांनी तो ‘सेप्टीक टँक’ माझे साहाय्य घेऊन स्वच्छ केला. केवढी ही गुरुसेवा !’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २६.८.२०२२)

श्री. शरद मेहेर – एक लाघवी व्यक्तीमत्त्व !

‘श्री. शरद मेहेर यांच्या निधनाची अनपेक्षित बातमी आली आणि धक्काच बसला. थोडा वेळ विश्वासच बसेना. इंदूरच्या गुरुपौर्णिमेच्या वेळी त्यांची भेट झाली नाही. कुणाला तरी विचारले असता कळले की, त्यांना पायाचे काही दुखणे झाले आहे; म्हणून ते येऊ शकले नाहीत; पण त्या दुखण्याचा अंत असा होईल, असे स्वप्नातही वाटले नाही.

प्रत्येक उत्सवाच्या वेळी मेहेर दांपत्याची भेट व्हायची. अत्यंत प्रेमळ, अगत्यशील, दांपत्य ! भेट झाली की, गप्पा व्हायच्या. एकमेकांबद्दल चौकशी व्हायची. ते डॉ. आठवले यांच्याबद्दल अगत्याने विचारायचे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायचे. कधी कधी श्री. मेहेरच उत्सवाला यायचे, तर कधी वहिनी एकट्याच यायच्या. दोघेही त्यांच्या व्यवहारात व्यस्त असल्यामुळे असे व्हायचे.

श्री. शरददादांना प.पू. बाबा आणि प.पू. दादा यांच्याबद्दल अत्यंत प्रेम, आस्था आणि श्रद्धा होती. त्यांच्यासाठी त्यांनी तन, मन आणि धन समर्पित केले होते. प.पू. बाबांनी त्यांना चिपळ्या दिल्या होत्या. प.पू. दादा जेव्हा जेव्हा भजन करायचे, तेव्हा तेव्हा ते चिपळ्या वाजवत त्यांच्या मागे बसायचे. ते दृश्य सारखे डोळ्यांसमोर उभे रहाते.

नगरची प.पू. दादांची गुरुपौर्णिमा त्यांनी अगदी थाटात पार पाडली. आम्ही त्यांच्या घरीच मुक्कामाला होतो. तेव्हा त्यांची धावपळ पाहून त्यांचे गुरूंप्रतीचे समर्पण लक्षात आले. तो गुरुपौर्णिमेचा सोहळा खूपच भावपूर्ण वातावरणात पार पडला होता.

प.पू. बाबा कांदळीला जायचे, तेव्हा श्री. शरददादा अगत्याने त्यांना भेटायला यायचे. प.पू. दादांबद्दलही त्यांना खूप जिव्हाळा, प्रेम होते, हे त्यांच्या वागण्याबोलण्यावरून दिसून यायचे. त्यांची मुले सौ. पूनम आणि सौरभ दोघेही प.पू. दादांना समर्पित होते. सौ. पूनम लग्नाआधी प.पू. दादांबरोबर भजनाला जायची.

प.पू. दादा त्यांना आपल्याबरोबर भजनाला घेऊन जायचे. त्यांचे भजन खूपच रंगायचे. श्री. शरददादा आता आपल्यात असणार नाही, ही गोष्ट स्वीकारणे खूपच कठीण जाणार आहे. त्यांचा लाघवी आणि प्रेमळ स्वभाव सतत आठवत रहाणार आहे. प.पू. बाबा आणि प.पू. दादा यांच्या कृपेने त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होईल, तसेच ‘हे डोंगराएवढे दुःख सहन करायची हिंमत आणि ताकद सरितावहिनींना ईश्वर आणि सद्गुरु देतील !’, याची मला खात्री आहे.’

– डॉ. (सौ.) कुंदा आठवले, मुंबई  (२८.८.२०२२)

 ‘सनातन मी चालवीन !’ हे प.पू. भक्तराज महाराज यांचे आशीर्वादरूपी वचन सनातनला कळवणारे (कै.) शरद मेहेर !

‘मी अध्यात्मप्रसारासाठी १९९० मध्ये ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ या संस्थेची स्थापना केली. फेब्रुवारी १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या दिवसांत एकदा प.पू. बाबा झोपलेले असतांना अचानक उठून बसले आणि म्हणाले, ‘‘सनातन मी चालवीन !’’ त्या वेळी प.पू. बाबांच्या समवेत (कै.) शरद मेहेर हे होते. प.पू. बाबांचे हे आशीर्वादरूपी वचन सनातनसाठी श्रद्धेचा आधारस्तंभ आहे. (कै.) शरद मेहेर यांनी प.पू. बाबांचे हे वाक्य आम्हाला कळवले, यासाठी आम्ही त्यांच्याप्रती शतशः कृतज्ञ आहोत.’

– डॉ. जयंत आठवले (प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य) (२८.८.२०२२)

(कै.) शरद मेहेर यांचे छायाचित्र पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे

१. ‘(कै.) शरद मेहेर यांच्या चेहर्‍यावर गुरूंप्रतीचा भाव जाणवतो. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘आता त्यांचा भाव दाटून येईल, डोळ्यांतून अश्रू येतील’, असे वाटते.

२. साधनेने त्यांच्या चेहर्‍यावर तेज आले आहे.

३. त्यांना पाहिल्यावर आनंद जाणवतो.

– सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी

सुश्री (कु.) दीपाली होनप यांना (कै.) शरद मेहेर यांचे छायाचित्र पाहिल्यावर जे जाणवले, अगदी तसेच मला जाणवले.

– डॉ. जयंत आठवले (प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य)