गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्री गणेशमूर्तींचे ३६ नमुने तपासणीसाठी पाठवले

मूर्तींमध्ये ‘कल्शियम सल्फेट’चे (प्लास्टर ऑफ पॅरिसपासून निर्माण होणारे) प्रमाण तपासणार

पणजी, २५ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभरातील श्री गणेशमूर्तींचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहेत. मूर्तींमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसपासून निर्माण होणार्‍या ‘कॅल्शियम सल्फेट’ या रसायनाचे प्रमाण प्रयोगशाळेत तपासले जाणार आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने नुकतीच श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्‍या विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून एकूण सुमारे ३६ नमुने गोळा केले. यामध्ये गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग महामंडळाने उभारलेल्या श्री गणेशमूर्ती विक्री केंद्राचाही समावेश आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एक शास्त्रज्ञ म्हणाले, ‘‘श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जात आहे का ? याची पडताळणी करण्यास मंडळाने प्रारंभ केला आहे. यासंबंधीचा अंतिम अहवाल पुढील कारवाई करण्यासाठी पर्यावरण खात्याला दिला जाणार आहे.’’ चिकण मातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीमध्ये ‘कॅल्शियम सल्फेट’चे प्रमाण ३ ते ५ टक्के आढळते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमध्ये ते अधिक असते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमध्ये ‘जीप्सम’ हे रसायन ८० टक्के किंवा त्याहून अधिक, कागदाचे (सेलुलोझ) प्रमाण १० टक्के, इतर रसायने (स्टार्च, बोरिक ॲसिड, पोॅटेशियम सल्फेट, वर्मीकुलाईट, ग्लास फायबर, पॅराफीन व्हॅक्स आणि क्रिस्टलाईन सिलिका ही रसायने) १-२ टक्के असते. गोवा सरकार वर्ष २०१२ पासून परराज्यांतून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या आयातीवर बंदी घालत आहे. गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात आणि विक्री केली जाऊ नये, यावर देखरेखीसाठी अबकारी अन् पर्यावरण खाते यांच्या अधिकार्‍यांचा एक गट सिद्ध करण्यात आलेला आहे. पर्यावरण खात्याच्या आदेशानुसार गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती आयात करता येत नाही किंवा विक्री करता येत नाही किंवा अशा मूर्तींची वाहतूक करता येत नाही. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पर्यावरण संरक्षण कायदा १९८६चे कलम १५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे आणि विक्रेत्याची व्यापार अनुज्ञप्ती रहित केली जाणार असल्याचे सरकारने आदेशात म्हटले आहे.

(गोव्यात प्रतिवर्षी पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यावर काही ठिकाणी या मूर्ती पाण्यात न विरघळल्याचे आढळते आणि नंतर त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याचे समजते. गेली १० वर्षे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी असतांना पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत किती जणांवर कारवाई झाली ? हा प्रश्नच आहे. त्यामुळे जनतेलाही ‘प्रशासन केवळ कायद्यांचे कागदी घोडे नाचवते; पण प्रत्यक्ष कारवाई झाल्याचे दिसून येत नाही’, असेच वाटते ! – संपादक)