‘वन्दे मातरम्’ म्हणू नका सांगणारे तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे आहात का ? – एकनाथ शिंदे

दूरभाषवर ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यावर आक्षेप घेणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या सडेतोड प्रश्नाने बोलती बंद !

सुधीर मुनगंटीवार यांनी जयंत पाटील यांना सुनावले !

तुम्ही अमेरिकेत शिक्षण घेतले, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल, असे वक्तव्य करू नका !

सुधीर मुनगंटीवार

वर्ष १८२७ मध्ये ‘हॅलो’चा उपयोग केला जाऊ लागला. ‘वन्दे मातरम्’ म्हणणे हा  इंग्रजांचे शब्दप्रयोग अल्प करण्याचा प्रयत्न आहे. जयंत पाटील तुम्ही अमेरिकेत शिकून आला आहात, असे प्रश्न उपस्थित करून तुम्ही अमेरिकेतील शिक्षणपद्धतीविषयी प्रश्न चिन्ह उपस्थित करू नका. ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भीम’, ‘जय महाराष्ट्र’ किंवा ‘वन्दे मातरम्’ म्हणा; परंतु कुणालाही ‘हॅलो’ म्हणून नका. ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम्’, म्हणजे ईश्वराच्या मुखातून निघालेल्या वेदांपेक्षा राष्ट्रभक्ताच्या मुखातून निघालेले ‘वन्दे मातरम्’ आम्हाला प्राणप्रिय आहे.

एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील

मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – ‘जय महाराष्ट्र’, ‘जय हिंद’, ‘जय श्रीराम’ यांना बंदी नाही, तर ‘हॅलो’ म्हणण्याला बंदी आहे. इंग्रज गेले, तरी त्यांना तुम्ही सोडत नाही. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते ‘वन्दे मातरम्’ म्हणत हसतहसत फासावर गेले. ‘वन्दे मातरम्’ बोलू नका’, असे इंग्रज म्हणायचे. ‘वन्दे मातरम्’ म्हणू नका सांगणारे तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे आहात का ? असा सडेतोड प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरभाषवर ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यावर आक्षेप घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची बोलती बंद केली.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या २५ ऑगस्ट या शेवटच्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा चर्चेला उत्तर दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याविषयी काढलेल्या परिपत्रकाविषयी निवेदन सादर करत ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित करत याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यांना जितेंद्र आव्हाड यांनी साथ देत ‘वन्दे मातरम्’ वर आक्षेप नोंदवला; मात्र मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांनी सडेतोड उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली.