गोवा : कुंकळ्ळे, म्हार्दाेळ येथे चोरट्यांची वाहने गावातील ‘राखणदारा’ने अडवल्याची स्थानिकांची श्रद्धा !

आधुनिक वैद्य आणि शासकीय अधिकारी डॉ. मधु घोडकिरेकर

फोंडा, १९ ऑगस्ट (वार्ता.) – घोडकिरेवाडा, कुंकळ्ळे, म्हार्दाेळ येथे १७ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी चोरट्यांनी  इतर ठिकाणाहून चोरलेल्या ३ दुचाक्या त्यांच्यासमवेत आणल्या होत्या. घरफोडी करतांना संबंधित घरातील व्यक्तींनी चोरट्यांना पकडले होते; मात्र चोरट्यांनी कशीबशी त्यांची सुटका करून घेतली. चोरट्यांनी चोरून आणलेल्या दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही. यामुळे चोरट्यांनी सायकल चोरून त्यावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना सायकलही पुढे नेता आली नाही. दुचाकी आणि सायकल रस्त्यावरच अडकून पडल्या. चोरटे पायीच तेथून पसार झाले. या दुचाकी किंवा सायकल कुणी अडवली ? हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. घोडकिरेवाडा, कुंकळ्ळे, म्हार्दाेळ येथे ‘राखणदार’ अर्थात् ‘देवचार’ याचे स्थान आहे. ‘राखणदारानेच चोरट्यांची दुचाकी आणि सायकल रोखून धरली’, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. स्थानिक रहिवासी, तथा आधुनिक वैद्य आणि शासकीय अधिकारी डॉ. मधु घोडकिरेकर यांनीही या घटनेला त्यांच्या ‘फेसबूक’ पोस्टद्वारे पुष्टी दिली आहे.

डॉ. मधु घोडकिरेकर ‘फेसबूक’ पोस्टमध्ये लिहितात, ‘‘घोडकिरेवाडा हा एक पवित्र वाडा आहे. याविषयी मी अनेक वेळा लिहिले आहे. येथील सोवळे आदीवासी परंपरेनुसार पाळले जाते आणि ते कडक आहे. या ठिकाणी कुक्कुटपालन वर्ज्य आहे. एकेकाळी आपली दहशत माजवत सत्तरीतील राणे या वाड्याच्या सीमेवर पोचले; परंतु तेथे त्यांचे डोळे फुटले आणि संपूर्ण गावभर ते परतीची वाट शोधू लागले. पोर्तुगिजांचीही अशीच स्थिती झाल्याने या वाड्यावर एकाही ख्रिस्त्याचे घर नाही. वाड्यावरील घरांना शक्यतो कुलुप लावले जात नाही. १७ ऑगस्टला चोरीची वाहने घेऊन चोरटे घरफोडी करण्यासाठी आमच्या वाड्यावर आले; परंतु त्यांना चोरीची वाहने परत नेता आली नाहीत. परिणामी गाड्यांच्या सर्व मालकांना त्यांच्या गाड्या मिळाल्या. ३ दुचाक्या या मालभाट, मडगाव येथील आहेत. या दुचाक्या पहाटे कुणी अडवल्या ? आम्ही असे मानतो की, पहाटेच्या वेळी राखणदाराची फेरी या वाटेवर असते. जेव्हा हा प्रकार घडला, तेव्हाही तोच प्रहर होता.’’

संपादकीय भूमिका

याविषयी अंनिसला काय म्हणायचे आहे ?