काकरमल (जिल्हा अमरावती) येथे मद्यधुंद शिक्षकाने विद्यार्थ्यांना घरी पाठवून वर्गात झोप काढली !

पालकांची गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार !

असे मद्यधुंद शिक्षक विद्यार्थ्यांना आदर्श काय करणार ? असे शिक्षक शैक्षणिक क्षेत्राला कलंकच आहेत. अशांना बडतर्फच करायला हवे !

अमरावती – जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील काकरमल गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक पृथ्वीराज चव्हाण (वय ३८ वर्षे) हे मद्य प्राशन करून शाळेत आले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘सुटी आहे’, असे सांगून घरी पाठवले आणि स्वतः शाळेत झोप काढली. वर्गातच लघुशंका केली. ही घटना १९ ऑगस्ट या दिवशी घडली. विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगताच काही पालकांनी शिक्षकांना याविषयी खडसावले. या वेळी चव्हाण यांनी पालकांसमवेत वाद घातला. या शिक्षकाची ध्वनीचित्रचकती सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहे.

या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंत २०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत एकूण ४ शिक्षक कार्यरत आहेत. उपसरपंच अशोक कासदेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जांभेकर यांच्यासह पालकांनी केंद्रप्रमुखांना घटनेची माहिती दिली. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली असून धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.