मनुष्याला रात्री वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘पृथ्वीवरील ज्या भूभागांवर सूर्यप्रकाश पडतो, त्या वेळी आणि त्यानंतर काही काळ सूर्याचा वातावरणावरील परिणाम सूक्ष्म रूपाने टिकून असतो; कारण सूर्यप्रकाशात दैवी अस्तित्व असते. त्यामुळे सूक्ष्मातील वाईट शक्तींना सूर्यप्रकाश असलेल्या भूभागांवर कार्य करणे कठीण जाते. रात्री सूर्यप्रकाशाचा त्या त्या भूभागांवरील परिणाम संपलेला असतो. परिणामी रात्री मनुष्याला वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात भोगावा लागतो. त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे.


श्री. राम होनप

१. काळ आणि सूर्यप्रकाशातून वातावरणात प्रक्षेपित होणारे प्रधान गुण

२. काळ आणि सूर्यप्रकाशाचा व्यक्तीच्या मनावरील परिणाम

३. भूभागांवर पडणार्‍या सूर्यप्रकाशाचा त्या त्या ठिकाणी असलेल्या वाईट शक्तींवर होणारा परिणाम

अ. सूर्यप्रकाशात वाईट शक्तींच्या सूक्ष्मदेहांना अग्नीत भाजल्याप्रमाणे वेदना होतात. त्यामुळे वाईट शक्ती उजेड असतांना झाडांच्या सावलीत किंवा काळोख असलेल्या ठिकाणी आश्रय घेतात.

आ. सूर्यप्रकाशातील तेजाने वाईट शक्तींची शक्ती न्यून होते. त्यामुळे काही वाईट शक्ती सूर्यप्रकाश असतांना मनुष्याला त्रास देण्याऐवजी अंधारात राहून स्वतःची साधना वाढवण्याकडे लक्ष देतात.

इ. सूर्यप्रकाशात अनंत दैवी शक्तींचे अस्तित्व असते. त्यामुळे पाताळांतील काही वाईट शक्ती उजेडाच्या वेळी त्यांचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर न येता पाताळांत राहून पृथ्वीवर आक्रमणे करण्यावर भर देतात.

ई. भूत किंवा पिशाच यांची बाधा व्यक्तीला सूर्यप्रकाशात होण्याचे प्रमाण अल्प असते. ते काळोखात किंवा सावलीत मनुष्याला बाधतात.

उ. दिवसा ‘सूर्यप्रकाशाचा त्रास होऊ नये’, यासाठी वाईट शक्ती अंधारी जागा किंवा भुयारी मार्ग यांचा उपयोग करतात. त्यामुळे वाईट शक्तींचा सूर्यप्रकाशाशी थेट संबंध येत नाही.

४. अन्य देशांच्या तुलनेत भारतात विपुल प्रमाणात सूर्यप्रकाश असूनही साधना नसल्याने सूर्यप्रकाशाचा मनुष्याला आध्यात्मिक लाभ न होणे

सूर्यप्रकाशात ‘तेज आणि अनंत प्रकारच्या दैवी शक्ती’ यांचा वास असतो. त्या दैवी शक्ती मनुष्याला शरीर, मन, बुद्धी आणि अध्यात्म यांदृष्ट्या बल प्राप्त करून देतात. त्यामुळे सूर्याला ‘बलोदेवता’, असे म्हणतात. ‘सूर्याचा मनुष्याला सर्वांगीण लाभ व्हावा’, यासाठी सनातन धर्मात सूर्याच्या उपासनेला पुष्कळ महत्त्व दिले आहे, उदा. सूर्याला नमस्कार करणे, त्याला अर्घ्य देणे आणि सूर्यदेवतेचा जप करणे इत्यादी. सूर्याची उपासना केल्याने त्यातील अनंत दैवी शक्ती मनुष्याला जीवनात विविध प्रकारे साहाय्य करतात. अन्य देशांच्या तुलनेत भारतात विपुल प्रमाणात सूर्यप्रकाश आहे; परंतु येथील बहुतांशी जीव उपासना करत नसल्याने त्यांना सूर्याच्या अस्तित्वाचा लाभ होत नाही, तसेच भारतातील जिवांना आध्यात्मिक त्रासाचे प्रमाणही अधिक आहे.

५. सूर्याच्या काही दैवी शक्तींची वैशिष्ट्ये

सूर्यात अनंत दैवी शक्ती आहेत. त्यांपैकी काही दैवी शक्तींची नावे आणि त्यांचे विश्लेषण पुढे दिले आहे.

५ अ. ‘सूर्यपद्मिनी’ : पद्मिनी हा शब्द ‘पुष्प’ या अर्थाने आहे. सूर्याच्या एका दैवी शक्तीचा आकार फुलाप्रमाणे आहे. तिचे कार्य ‘मनुष्याला जगण्याची प्रेरणा देणे आणि उत्साह देणे’, हे आहे. या दैवी शक्तीची निर्मिती सूर्यापासून झाली आहे. त्यामुळे तिला ‘सूर्यपद्मिनी’, असे म्हणतात.

५ आ. ‘सूर्यदामिनी’: यातील दामिनी हा शब्द ‘विजयश्री’ या अर्थाने आहे. सूर्याची एक दैवी शक्ती मनुष्याला विजय प्राप्त करून देते. तिला ‘सूर्यदामिनी’, असे म्हणतात.

५ इ. ‘सूर्यनभा’ : यातील नभा शब्द ‘व्यापक’ या अर्थाने आहे. सूर्याची एक दैवी शक्ती व्यापक स्वरूपात कार्य करते. तिला ‘सूर्यनभा’, असे म्हणतात.

५ ई. ‘सूर्यप्रभा’ : यातील प्रभा हा शब्द ‘विस्तार करणारी’, या अर्थाने आहे. सूर्याची एक दैवी शक्ती त्याच्या कार्याचा विस्तार करते. तिला ‘सूर्यप्रभा’, असे म्हणतात.

५ उ. ‘सूर्यकांती’ : सूर्यातील ज्या दैवी शक्तीचे शरीर हे सूर्याप्रमाणे तेजयुक्त किंवा प्रकाशमान आहे, तिला ‘सूर्यकांती’, असे म्हणतात. ही दैवी शक्ती ‘प्राणी आणि पक्षी’ यांच्या त्वचेचे पोषण करते.

५ ऊ. ‘सूर्यकला’ : यातील ‘कला’ हा शब्द ‘रचनेशी’ संबंधित आहे. सूर्याच्या रचना, म्हणजे सूर्यकिरणांची गती, त्याचे स्वरूप आणि त्यातील रंग यांच्याशी संबंधित आहे. सूर्याच्या कार्याला विशिष्ट स्वरूप प्राप्त करून देणार्‍या दैवी शक्तीला ‘सूर्यकला’, असे म्हणतात.

६. सूर्यप्रकाशामुळे वाईट शक्तींच्या अखंडपणे चालू असलेल्या कार्यात बाधा निर्माण होणे

वाईट शक्तींना कार्य करण्यासाठी दिवस किंवा रात्र यांचे बंधन नसते. त्या अखंड कार्यरत असतात. त्या मनुष्याला सदैव त्रास देतात; परंतु जोपर्यंत सूर्यप्रकाश आणि त्याचा परिणाम वातावरणात टिकून असतो, तोपर्यंत वाईट शक्तींचा मनुष्याला होणारा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होतो.

७. सायंकाळपासून वाईट शक्तींचे कार्य प्रभावीपणे चालू होणे

भूभागावरील सूर्यप्रकाशाचा प्रभाव सायंकाळानंतर न्यून होत जातो, तसा त्याचा व्यक्तीवरील प्रभावही न्यून होत जातो. त्यामुळे त्या वेळी व्यक्तीचे मन अधिकाधिक चंचल होऊ लागते. तिच्या मनात इच्छा आणि वासना यांचे कार्य वाढू लागते. त्याचा लाभ वाईट शक्तींना होतो. वाईट शक्ती अशा व्यक्तींवर सूक्ष्मातून सहजतेने आक्रमणे करतात आणि त्या व्यक्तीला स्वतःच्या नियंत्रणात घेतात.

८. देवता, सूक्ष्मरूपांतील ऋषी आणि महात्मे यांचे कार्य

देवता, सूक्ष्मरूपांतील ऋषी आणि महात्मे यांचा सूक्ष्मरूपात अखंड वास असतो. ते मनुष्याला साहाय्य करण्यास दिवस-रात्र सदैव तत्पर असतात; परंतु मनुष्याची उपासना नसल्याने त्याला त्यांचा आध्यात्मिक लाभ होत नाही. परिणामी व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास तीव्र स्वरूपात भोगावा लागतो.

९. साधकाला सदैव देवाचे साहाय्य मिळत असल्याने त्याला सूर्यप्रकाश, स्थळ आणि काळ यांचे बंधन नसणे

सूर्यप्रकाशामुळे मनुष्याचे वाईट शक्तींपासून काही प्रमाणात रक्षण होते. अशा मनुष्याच्या त्रासाची तीव्रता दिवस-रात्रीचे निसर्गचक्र, स्थळ आणि काळ यांवर अवलंबून असते. याउलट साधक सतत देवाच्या अनुसंधानात असतो. त्यामुळे त्याला सतत देवाचे साहाय्य आणि कृपा प्राप्त होत असते. असा साधक सूर्यप्रकाशात असो किंवा नसो, तो कुठल्याही देशात असो अथवा कुठलीही वेळ असो, त्याचे रक्षण देव स्वतः करत असतो.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.