कृष्णाला सखा मानून त्याच्याशी संवाद साधतांना साधिकेला सुचलेली भावपुष्पे !

मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर बसून त्याच्याकडे पहात असतांना मला वाटते, ‘सगळे काही तिथेच थांबले आहे.’ त्या वेळी मला कृष्णाविषयी एक वेगळेच प्रेम जाणवते. मला ते शब्दांत वर्णन करता येत नाही. माझ्या मनात त्याच्याविषयी एक प्रकारची ओढ निर्माण होते आणि मला काव्य किंवा लिखाण सुचते. पूर्वी मी कधीच कविता केल्या नाहीत. मला कविता सुचण्याचा आरंभ कृष्णाच्या चित्रासमोर बसल्यावर झाला. त्याच्यासमोर बसल्यावर मी त्याच्याशी असा काव्य रूपात संवाद साधते. मला कृष्णावर अतिशय उत्स्फूर्त काव्य सुचत असून त्या भावपूर्ण रचना येथे दिल्या आहेत.

१. शोधावे तुज परि कुठे लपूनी बससी ।

भगवंताने निर्माण केलेली ही सृष्टी फार सुंदर आहे आणि या सुंदर सृृष्टीमध्ये तोच लपून बसला आहे, म्हणजे त्याच्या समवेत चाललेला हा लपंडावाचाच खेळ नव्हे का ? जो त्याला शोधतो आणि प्राप्त करतो, तोच सर्वकाही मिळवतो. मलाही असेच तुला शोधता येऊ दे कान्हा !

सृृष्टीचे पालन करत लपंडाव खेळीसी ।
शोधावे तुज परि कुठे लपूनी बससी ।। १ ।।

या सृृष्टीचा कर्ता तू, प्रत्येकाचा करविता तू ।
सर्वत्रचा सूक्ष्म नाद तू, येणारा दैवी गंध तू ।। २ ।।

बंद नेत्रामागे हळूच कानी बोलिसी ।
शोधिता ओळख होईल स्वरूपाची ।। ३ ।।

– कु. वैष्णवी जाधव (आताच्या सौ. अनन्या अक्षय पाटील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक