पणजी, ५ ऑगस्ट (वार्ता.) – म्हादई पाणीतंटा प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असतांना कर्नाटक राज्याने हलतरा नाल्यावर पाणी वळवण्यासाठी खांब उभे करून आखणी (मार्किंग) चालू केली आहे. ही गोष्ट सर्वाेच्च न्यायालयासह म्हादई जलतंटा लवाद यांच्यासमोर मांडणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘म्हादई प्रश्नी गोवा सरकार गंभीर आहे. म्हादई पाणीवाटप तंटा सध्या सर्वाेच्च न्यायालय आणि म्हादई पाणीवाटप लवाद यांच्याकडे आहे. याविषयी अधिक संशोधन करण्यासाठी लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वाेच्च न्यायालयात या प्रकरणी १० ऑगस्ट या दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये कर्नाटक सरकारने ‘म्हादई प्रश्नी संपूर्ण निकाल येईपर्यंत पाण्याचा वापर करणार नाही आणि पाणी वळवणार नाही’, असे स्पष्ट केले होते.’’
‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांचे राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी कर्नाटक सरकारने म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी बंधारा बांधण्याची सिद्धता चालवल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहिले आहे. गोवा सरकारने या प्रकरणाचे अन्वेषण करून हा प्रकार म्हादई पाणी तंटा लवाद आणि सर्वाेच्च न्यायालय यांच्या निदर्शनास आणून देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.