राज्यात ५ वर्षांत नक्षलवाद्यांच्या भरतीचे प्रमाण उणावले !

प्रमाण ८५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर !

गडचिरोली – येथील सीमावर्ती भागातील नक्षलवाद्यांच्या भरतीतील महाराष्ट्राचे प्रमाण ५ वर्षांपूर्वी ८५ टक्के होते, ते आता ४० टक्क्यांवर आले आहे. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि महाराष्ट्र केडरचा सचिव सह्याद्री उपाख्य दीपक उपाख्य मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २७ नक्षलवाद्यांचा नोव्हेंबर २०२१ मध्ये पोलिसांनी खात्मा केल्यानंतर नक्षलवाद्यांचा प्रभाव ओसरल्याचे दिसते. २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत नक्षलवाद्यांकडून ‘हुतात्मा सप्ताह’ पाळण्यात येतो. यात पोलिसांवर आक्रमणे केली जातात, तसेच पोलिसांच्या आक्रमणात हुतात्मा झालेल्या नक्षलवाद्यांची स्मारके उभारण्याचा कार्यक्रम असतो. यंदा अनेक वर्षांनंतर चकमकीविना हा सप्ताह पार पडला. गडचिरोली-गोंदिया या नक्षलग्रस्त अतीसंवेदनशील जिल्ह्यांसह छत्तीसगड आणि तेलंगणा यांच्या सीमावर्ती भागांतही नक्षलवाद्यांना मोठ्या हिंसक कारवाया घडवून आणता आल्या नाहीत. त्यांचे ‘बंद’चे आवाहन फुसके ठरले.


गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी कारवाया जवळजवळ ठप्प झाल्या आहेत. पोलिसांनी नक्षलवाद्यांपुढे आत्मसमर्पण, अटक किंवा चकमक (एन्काऊंटर) हे ३ पर्याय ठेवले होते.

नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आणि आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. – अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली.

संपादकीय भूमिका 

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश आहे. संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !