पावसाळ्यात मध्येच पाऊस थांबून काही दिवस ऊन पडते, त्या काळात घ्यायची काळजी

१. ‘पाऊस थांबून ऊन पडू लागणे’, हे शरिरातील पित्त वाढण्यास कारण ठरणे

‘काही वेळा पावसाळ्यात सतत पडणारा पाऊस थांबून मध्येच ऊन पडू लागते. काही दिवस पाऊस न पडता असे सतत ऊन पडू लागले, तर त्यामुळे शरिरामध्ये पित्ताचा प्रकोप होऊ लागतो. (‘प्रकोप’ म्हणजे ‘अधिक प्रमाणात वाढ होणे’) अशा वेळी डोळे येणे (कंजंक्टिवायटिस), ताप येणे, अंगावर पुळ्या येणे, विसर्प (नागीण), अतीसार (जुलाब) यांसारखे विकार उद्भवू शकतात. पावसाळा संपतांना, साधारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये अशाच प्रकारचे वातावरण असते. तेव्हाही हे विकार उद्भवू शकतात.

वैद्य मेघराज पराडकर

२. काय टाळावे ?

आंबट, खारट आणि तिखट चवीचे, तसेच तेलकट पदार्थ पित्त वाढवतात. त्यामुळे वरीलप्रमाणे वातावरण असतांना असे पदार्थ खाणे टाळावे. मिरची किंवा लाल तिखट यांचा वापर अत्यल्प करावा. ‘आम्हाला लाल तिखटाविना होत नाही. ते जेवणात भरपूर घातल्याखेरीज जेवणाला चवच येत नाही. आम्हाला त्याची सवय आहे. त्यामुळे आम्हाला काहीही अपाय होणार नाही’, असे विचार करून स्वतःची हानी करून घेऊ नये. शेव, चिवडा, फरसाण, बाकरवडी यांसारखे फराळाचे पदार्थ, तसेच वडापाव, दाबेली, पाणीपुरी, शेवपुरी यांसारखे चटपटीत आणि तिखट किंवा तेलकट पदार्थही टाळावेत. अशा काळात भूक लागल्यावरच जेवावे. भूक नसतांना खाण्याचा प्रसंग आल्यास अल्प प्रमाणात खावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२२)