१. श्रावणमासाचे महत्त्व
‘भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या ‘श्रीमद्भगवत्गीते’तील संवादात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘मासांमध्ये (महिन्यांमध्ये) मी ‘मार्गशीर्ष’ मास आहे. याचप्रमाणे शिव आणि सनतकुमार यांच्यामध्ये श्रावणमासाबद्दल पुढील आशयाचा संवाद झाल्याचे पुराणात म्हटले आहे. भोलेनाथ शिव म्हणतो,
द्वादशस्वपि मासेषु श्रावणो मेऽतिवल्लभः । श्रवणार्हं यन्माहात्म्यं तेनासौ श्रवणो मतः ।।
श्रवणर्क्षं पौर्णमास्यं ततोऽपि श्रावणः स्मृतः । यस्य श्रवणमात्रेण सिद्धिदः श्रावणोऽप्यतः ।।
अर्थ : १२ मासांतील ‘श्रावण मास’ मला अतिप्रिय आहे. त्याचे माहात्म्य श्रवण करण्यास योग्य आहे. त्यामुळे त्याला ‘श्रावण मास’ असे म्हटले जाते. श्रावण या शब्दाची उत्पत्ती ‘श्रवण’ या शब्दातून झाली आहे. ‘श्रवण’ शब्दाचे २ अर्थ होतात. त्यांपैकी एक म्हणजे ‘हिंदु पंचांगातील २२ वे नक्षत्र’, असा आहे आणि दुसरा अर्थ ‘श्रवण म्हणजे ऐकणे.’ श्रावणात श्रवणभक्ती केल्याने सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळेच हा मास अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो.
२. हिंदु कालगणनेनुसार १२ मासांची नावे ही त्या त्या मासांच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रानुसार असणे
हिंदु धर्मात पंचांगातील ५ अंगांपैकी ‘नक्षत्र’ या अंगाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे हिंदु कालगणनेनुसार १२ मासांची नावे ही त्या त्या मासाच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रानुसार आहेत, उदा. चैत्र मासातील पौर्णिमेला चंद्र ‘चित्रा’ नक्षत्रात असतो; म्हणून त्या मासाचे नाव ‘चैत्र’ आहे. श्रावणातील पौर्णिमेला चंद्र ‘श्रवण’ नक्षत्रात असतो. त्यामुळे त्या मासाचे नाव ‘श्रावण’ आहे. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्राचे चैतन्य आणि ऊर्जा त्या संपूर्ण मासात अधिक प्रमाणात कार्यरत असते.
३. ‘श्रवण’ नक्षत्राची वैशिष्ट्ये
शास्त्रानुरुक्तो बहुपुत्रमित्रः सत्पात्रभक्तिः विजितारिपक्षः ।
चेज्जन्मकाले श्रवणा हि यस्य प्रेमा पुराणश्रवणे प्रवीणः ।।
– जातकाभरण
अर्थ : श्रवण नक्षत्रावर जन्माला आलेला मनुष्य शास्त्रप्रेमी, अनेक मित्र असलेला, मुलाबाळांची आवड असणारा, विधायक कार्ये करणारा, शत्रूंवर विजय मिळवणारा, पुराणश्रवण आदींमध्ये रुची असलेला असतो.
३ अ. चंद्र श्रवण नक्षत्रात असतांना संपूर्ण पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात सकारात्मकता निर्माण झाल्याने या काळात धर्मशास्त्राचे पालन करण्याची वृत्ती वाढणे : श्रावण मासात श्रवण नक्षत्राची चैतन्यमय ऊर्जा अधिक कार्यरत असते. त्यामुळे चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे या काळात धर्मशास्त्राचे पालन करण्याची वृत्ती किंवा तशी मानसिकता वाढते. याचे कारण चंद्र मनाचा कारक आहे आणि ‘श्रवण’ हे चंद्राचे नक्षत्र आहे. ज्योतिषी परिभाषेत ‘चंद्र स्वनक्षत्री आहे’, असा त्याचा अर्थ होतो.
३ आ. लोकांचे सामाजिक जीवन नेहमीच्या तुलनेत या काळात अधिक सौहार्दपूर्ण (मैत्रीपूर्ण) असणे : या काळात लोकांचे सामाजिक जीवन नेहमीच्या तुलनेत अधिक सौहार्दपूर्ण (मैत्रीपूर्ण) असते. आपले कुटुंबीय, नातेवाइक किंवा मित्रमंडळी यांच्याशी जुळवून घेणे, त्यांना समजून घेणे इत्यादी गुण या काळात अधिक वाढतात.
३ इ. या मासात सकारात्मक आणि विधायक कार्य करण्याची ओढ अधिक वाढते.
३ ई. सत्त्वगुणी लोकांच्या सहवासात अधिक वेळ राहून समाजविघातक, विध्वंसक किंवा नकारात्मक वृत्तीच्या लोकांपासून दूर रहाणे : समाजामध्ये उच्च प्रतीची संवेदनशीलता निर्माण होते. समाजातील सत्यनिष्ठ, न्यायाला धरून वागणारे, पापभिरू, सज्जन अशा सत्त्वगुणी लोकांप्रती इतरांच्या मनात आदराची भावना निर्माण होते. त्यामुळे काही लोक त्यांच्या सहवासात अधिक वेळ रहाण्याचा प्रयत्न करतात. परिणामस्वरूप ते लोक समाजविघातक, दुष्ट स्वभावाच्या, विध्वंसक किंवा नकारात्मक वृत्तीच्या लोकांपासून सहजपणे दूर होऊ शकतात.
३ उ. ग्रह-तार्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे वैश्विक ऊर्जा आणि चैतन्य निर्माण झाल्याने मानवाची ज्ञान ग्रहण करण्याची अन् सात्त्विक विचारांना आचरणात आणण्याची ओढ वाढणे : श्रावण मासात आकाशमंडळात ग्रह-तार्यांची एक विशिष्ट स्थिती असते. त्यातून संपूर्ण पृथ्वीवर एक सकारात्मक वैश्विक ऊर्जा आणि चैतन्य कार्यरत होते. या चैतन्यामुळेच मानवाची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता या काळात सर्वाधिक वाढते. ज्ञान ग्रहण करता येण्यासाठी जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा मानवाला या काळात सहजपणे मिळते. समाजात सात्त्विक विचारांना प्रत्यक्ष आचरणात आणण्याची ओढ वाढते.
३ ऊ. ‘श्रवण करण्या’चे महत्त्व
३ ऊ १. वेदांमध्ये ‘श्रवण करणे’, हे ज्ञानप्राप्तीचे एकमेव साधन मानणे : ‘श्रवण करणे’ म्हणजे ऐकणे. वेदांमध्ये ‘श्रवण करणे’, हे ज्ञानप्राप्तीचे एकमेव साधन मानले आहे. केवळ श्रवणेंद्रियांच्या माध्यमातूनच परमात्म्याला आपण जाणून घेऊ शकतो; म्हणून हिंदु धर्मात ‘श्रुतीं’ना प्रमाण मानले आहे. प्राचीन काळी गुरूंच्या मुखातून दिलेले ज्ञान शिष्य किंवा विद्यार्थी श्रवणेंद्रियांद्वारेच ग्रहण करत असत.
३ ऊ २. ‘चाणक्यसूत्रां’नुसार ‘श्रवण करणे’ याचे लाभ : त्यामुळेच आचार्य चाणक्यांनीही ‘केवळ श्रवण केल्याने ४ प्रकारचे लाभ होतात’, असे सांगितले आहे.
श्रुत्वा धर्मं विजानाति श्रुत्वा त्यजति दुर्मतिम् ।
श्रुत्वा ज्ञानमवाप्नोति श्रुत्वा मोक्षमवाप्नुयात् ।।
– चाणक्यनीती, अध्याय ६, श्लोक १
अर्थ : ऐकण्याचे पुढील ४ लाभ होतात.
अ. धर्मज्ञान आकलन होणे अत्यंत कठीण आहे; परंतु श्रवण केल्यानेच ते साध्य होते.
आ. धर्मज्ञान श्रवणामुळे आपले वेडेवाकडे आचार-विचार (दुर्मती) दूर करू शकतो.
इ. श्रवणामुळे आपल्याला खरे किंवा योग्य ज्ञान मिळते.
ई. श्रवणामुळेच मोक्षप्राप्तीसुद्धा होते.
३ ऊ ३. श्रवणामुळे जीवनात चांगले पालट होण्याची शक्यता श्रावण मासात सर्वाधिक असणे : आपण जे श्रवण करतो, त्यामुळे आपल्या जीवनात काही चांगले पालट होण्याची शक्यता श्रावण मासात सर्वाधिक असते. हेच या श्रावणमासाचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य आहे.
३ ऊ ४. उपवास, उदात्त कार्य करणे आणि श्रवणभक्ती यांतून पुण्यप्राप्ती मिळवण्याचा हा काळ असणे : उपवासामुळे आपल्यात ‘संयम’ हा गुण विकसित होतो; म्हणून उपवास करायचा. आपल्या काही हानीकारक सवयी, दोष, उणिवा इत्यादी गोष्टी दूर करण्यासाठी किंवा आपल्या जीवनात काही उदात्त कार्य करण्याची आपली सिद्धता असेल, तर त्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असतो. यातील काहीच करायचे नसेल, तर केवळ श्रवणभक्तीही करू शकतो. त्यामुळे पुण्यप्राप्ती होईल. अशा प्रकारे या ३ ही गोष्टींचा लाभ केवळ श्रवण केल्याने होतो.
३ ऊ ५. श्रावणात श्रवण केलेले ‘सुफळ संपूर्ण’ होणे : आपण जे ऐकले (श्रवण केले), त्यामुळे आपल्यातील दोष आणि अहंकार यांचे निर्मूलन होऊन आपण खरे ज्ञानवंत होण्यासाठी संपूर्ण विश्वात एक प्रकारची ग्रहणशक्ती किंवा धारणाशक्ती श्रावणात सहज उपलब्ध होते. त्यामुळे श्रावणात आपण जे श्रवण करतो, ते ‘सुफळ संपूर्ण’ होते.
४. श्रावण मासातील धर्माचरण म्हणजे ब्रह्मांडातील ग्रह, तारे आणि नक्षत्र यांचे मानवी जीवनावर किंवा चराचर सृष्टीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असल्याचा पुरावा असणे
हिंदु संस्कृतीचे निर्माते असणार्या ऋषिमुनींना याचे सर्व ज्ञान होते. त्यामुळेच त्यांनी आपल्यावर उत्तम आणि उदात्त संस्कार व्हावेत आणि आपल्याला आवश्यक ते धर्मज्ञान सहजपणे मिळावे, यांसाठी श्रावण मासात अधिकाधिक ग्रंथ, कथावाचन, पारायण, व्रतवैकल्ये, दानधर्म इत्यादी करण्याचे मार्गदर्शन केले आहे.
त्यामुळेच वर्षभर मांसाहार करणारे लोक श्रावण मासात मांसाहार पूर्णतः वर्ज्य करतात. बहुतेक घरांत श्री सत्यनारायणाची पूजा अगत्याने केली जाते. श्रावणात प्रत्येक वारानुसार व्रते, विशेष पूजा, उपवास इत्यादी गोष्टी स्त्रिया तर करतातच; पण बहुतेक पुरुषसुद्धा दाढी न करणे, केस न कापणे, तसेच उपवास करणे, घरात श्रीगुरुचरित्र, श्रीनवनाथ माहात्म्य, शिवलीलामृत, शिवपुराण किंवा कुठल्याही धार्मिक ग्रंथांची पारायणे इत्यादी आचारांचे पालन करतातच. त्यामुळे ‘ब्रह्मांडातील ग्रह, तारे आणि नक्षत्रे यांचे मानवी जीवन किंवा चराचर सृष्टी यांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतातच’, याचाच हा पुरावा आहे.
तात्पर्य काय, तर हिंदु धर्मशास्त्रातील विज्ञान समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर, ते ते घडवण्यासाठी कटिबद्ध असणार्या प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेला या ‘श्रवण’ नक्षत्रामुळे आणि ‘श्रावण’ मासामुळे योग्य ते क्रियमाण वापरण्यासाठी भरपूर प्रमाणात बळ मिळते.
५. कृतज्ञता
श्री गुरुकृपेने जे मिळाले, ते त्यांच्याच सुकोमल चरणी अर्पण !’
– श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.८.२०२१)