‘गायन, नृत्य आदी कला प्रस्तुत करण्यासाठी व्यक्तीचा स्थूलदेह हे माध्यम असते. ‘या कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’ हा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी कलेच्या प्रस्तुतीकरणात कलाकाराच्या स्थूलदेहासह मन, बुद्धी आणि चित्त यांचाही सहजतेने अंतर्भाव असणे आवश्यक असते.
सध्याच्या काळात बहुतांश कलाकार साधना न करणारे असल्याने या कलांचे सादरीकरण करण्यासाठी ते केवळ स्थूलदेहाचाच वापर अधिक करतात. त्यामुळे गायनक्षेत्रात सरावाच्या (रियाजाच्या) दृष्टीने गळा आणि नृत्यासाठी शरीर सुडौल ठेवणे, अशा बाह्य (स्थुलातील) गोष्टींकडेच कलाकारांचे अधिक लक्ष असते. या कला ईश्वरप्राप्तीसाठी असून त्यासाठी मन, बुद्धी आणि चित्त शुद्ध असावे, याची त्यांना जाणीव नसल्यामुळे या कलांचे सादरीकरण करतांना त्यांना मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्म स्तरावरील अनुभूती घेता येत नाहीत.
याउलट साधना म्हणून गायन, नृत्य करणारे साधक केवळ स्थूलदेहाच्या माध्यमातूनच नव्हे, तर त्यासह मन, बुद्धी आणि चित्त यांच्या स्तरावरही या कलांचा अभ्यास करतात. समाजातील बहुतांश कलाकारांप्रमाणे साधक कलाकार कलेकडे केवळ मनोरंजन किंवा अर्थार्जन या दृष्टीकोनातून पहात नाहीत. तो त्या कलेला ईश्वरप्राप्तीचे माध्यम बनवून स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीनुसार मन, बुद्धी आणि चित्त यांची शुद्धी होण्यासाठी प्रयत्नरत असतो. त्यामुळे त्याला भगवंताचा आशीर्वाद मिळतो आणि साधकांना भावजागृती होणे, ध्यान लागणे, सूक्ष्म गंध येणे, कुंडलिनी जागृती इत्यादी सूक्ष्म, सूक्ष्मतर अनुभूती येतात. साधकांनी या कलांचा उपयोग ईश्वरप्राप्तीसाठीचे माध्यम म्हणून केल्याने त्या कलांतील सात्त्विकता तो स्वतः आणि प्रेक्षकही अनुभवू शकतात. त्याचप्रमाणे या सात्त्विक कलांच्या माध्यमातून ईश्वरी अनुभूती येण्याचे प्रमाणही अधिक असते.
‘कलाकारांनो, गायन, नृत्य आदी कलांचा उपयोग साधनेचे (ईश्वरप्राप्तीचे) माध्यम म्हणून करण्याचा प्रयत्न करून आपल्या कलेचे, पर्यायाने आपल्या जीवनाचे खर्या अर्थाने सार्थक करूया !’
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.१.२०२२)