श्रावण मास आणि त्यातील सण, व्रते अन् उत्सव !

१. श्रावण मासातील शिवोपासना 

१ अ. श्रावण मास आणि भगवान शिवाच्या पूजेचे महत्त्व : ‘चंद्रवर्षानुसार हिंदु वर्षाच्या पाचव्या मासाला ‘श्रावण मास’, असे म्हणतात. हा मास भगवान शिवाला विशेष प्रिय आहे. त्यामुळे या मासात आशुतोष भगवान सांबसदाशिवाची पूजा-अर्चा यांचे विशेष महत्त्व आहे. ज्याला प्रतिदिन शिवाचे पूजन करणे शक्य नाही, त्याने निदान सोमवारी शिवपूजा आणि व्रत अवश्य करावे; कारण सोमवार भगवान् शिवाचा प्रिय वार आहे.

१ आ. श्रावणात सोमवारचे व्रत, प्रदोष व्रत आणि शिवपिंडीचे पूजन करणे : श्रावण मासात सोमवारचे व्रत, प्रदोष व्रत आणि शिवपिंडीचे पूजन हे परम कल्याणकारी असते. सोमवारी प्रदोष तिथी आली, तर ती विशेष फलदायी असते. या व्रताच्या दिवशी भगवान शिवाची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा, पंचाक्षर मंत्राचा जप (‘नमः शिवाय ।’ यामध्ये ॐ कार समाविष्ट केल्यावर तो ‘षडाक्षरी मंत्र’ होतो.), स्तोत्रपठण, अभिषेक इत्यादी विशेष रूपाने करावे. हे सर्व सायंकाळी (प्रदोषकाळात) केल्यास विशेष महत्त्वपूर्ण होते. दिवसभर व्रत करून पूजन केल्यानंतर रात्री भोजन करावे. भोजनात काही जण एकच पदार्थ खाण्याचाही नियम करतात किंवा केवळ फलाहार करतात.

१ इ. श्रावणात लघुरुद्र, महारुद्र आणि अतिरुद्रपाठ करणे : श्रावण मासात लघुरुद्र, महारुद्र आणि अतिरुद्रपाठ करवून घेण्याचाही नियम आहे. यजुर्वेदांतर्गत रुद्राष्टाध्यायाचा यामध्ये विशेष रूपाने पाठ असतो. हे अनुष्ठान पाठात्मक, अभिषेकात्मक आणि हवनात्मक अशा ३ रूपांमध्ये असते.

१ ई. भगवान शिवाला अभिषेक करणे आणि बिल्वपत्र वहाणे : भगवान शंकराला पाण्याची संततधार विशेष प्रिय आहे; म्हणून पावसाळ्यात येणार्‍या श्रावण मासात भगवान शिवाची अभिषेक करून आणि बिल्वपत्र वाहून पूजा केली जाते. बिल्वपत्र तोडतांना वृक्षाला नमस्कार करून पुढील मंत्र म्हणावा.

अमृतोद्भव श्रीवृक्ष महादेवप्रियः सदा ।
गृह्णामि तव पत्राणि शिवपूजार्थमादरात् ।।

अर्थ : अमृतापासून उत्पन्न झालेल्या हे ऐश्वर्यपूर्ण वृक्षा, तू महादेवांना नेहमी प्रिय आहेस. शिवपूजेसाठी मी तुझी पाने तोडत आहे.

१ उ. शिवाच्या उपासनेमध्ये भस्म आणि रुद्राक्ष धारण करण्याचेही विशेष महत्त्व असते.

१ ऊ. श्रावण मासात भगवान शिवाच्या उपासनेच्या समवेत श्रीराम अन् श्रीकृष्ण यांच्या मंदिरातही विविध उत्सव साजरे करावे ! : श्रावण मासात भगवान शिवाच्या उपासनेप्रमाणेच भगवान विष्णूची पूजाही केली जाते. त्यामध्ये त्याचा डोलोत्सव आणि झुल्यावर बसून झोके घेण्याचा उत्सवही आनंदाने साजरा केला जातो. श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिरातही विविध प्रकारचे पौराणिक देखावे सिद्ध केले जातात अन् उत्सव साजरा केला जातो.

२. श्रावण मासातील विशिष्ट वार आणि तिथीला करावयाची व्रत-वैकल्ये

२ अ. सोमवार आणि मंगळवारचे व्रत : श्रावण मासात सोमवार व्रताचा महिमा आहे, तसेच मंगळवारीही व्रत केले जाते. सोमवारी शिवाचे, तर मंगळवारी शिवप्रिया भगवती मंगळागौरीचे पूजन केले जाते. विवाहानंतर प्रत्येक स्त्रीने ४ – ५ वर्षांपर्यंत हे व्रत केले पाहिजे. हे व्रत अखंड सौभाग्य आणि पुत्रप्राप्ती यांसाठी केले जाते. भगवती मंगळागौरीसाठी पुढील मंत्र उच्चारून व्रत केले पाहिजे.

कुङ्कुमागरुलिप्ताङ्गां सर्वाभरणभूषिताम् ।
नीलकण्ठप्रियां गौरीं वन्देऽहं मङ्गलाह्वयाम् ।।

– मङ्गलागौरीपूजाविधि

अर्थ : कुंकवाने आणि अगरूने (चंदनासारख्या एका सुगंधी चूर्णाने) अंग विलेपित असलेल्या, सर्व अलंकारांनी विभूषित असलेल्या, भगवान शंकरांना प्रिय अशा हे गौरी, मंगल कार्यासाठी मी तुझे आवाहन करतो.

सलग ४ वर्षांपर्यंत मंगळागौरीचे व्रत करावे. ५ व्या वर्षी किंवा नंतर त्याचे उद्यापन करावे.

२ आ. श्रावण कृष्ण द्वितीया : श्रावण कृष्ण द्वितीयेला ‘अशून्यशयनव्रत’ साजरे केले जाते. या व्रताने वैधव्य आणि विधुरत्व येत नाही. या वेळी उपवास करून भगवान लक्ष्मी-नारायणाची उपासना केली जाते.

२ इ. श्रावण कृष्ण तृतीया : श्रावण शुक्ल तृतीयेप्रमाणे श्रावण कृष्ण तृतीयेला ‘कज्जलीतृतीया’ असे म्हणतात. या तिथीला ‘कजलीतीज’ असेही म्हणतात. या तिथीला श्रवण नक्षत्रात भगवान् विष्णूचे पूजन केले जाते. उत्तर प्रदेशात विशेषरूपाने ‘कजली तीज’ साजरी करण्याची परंपरा आहे. यामध्ये ‘कजरी’चे गायनही असते. हे एक प्रकारे लोकोत्सवपर्व आहे. या दिवशी स्त्रिया सोहळ्याच्या निमित्ताने मेंदी काढतात आणि झोपाळ्यावर झोके घेतात. याच तिथीला ‘स्वर्णगौरीव्रत’सुद्धा केले जाते.’

(साभार : मासिक ‘कल्याण’, जुलै २०१६)