१३ जुलै २०२२ या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेला आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधिकेला ‘दत्तगुरूंना माझा नमस्कार सांगा’, असे सांगणे आणि त्यांच्या माध्यमातून भगवंतानेच दत्तगुरूंच्या दर्शनाचा संकेत दिल्याचे गुरुपौर्णिमेचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना लक्षात येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘१३.७.२०२२ या दिवशी, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना एका साधिकेचा वाढदिवस असल्याचे समजले. तेव्हा त्यांनी मला त्या साधिकेला भ्रमणभाष लावून देण्यास सांगितले. त्यांच्याशी बोलत असतांना ते त्या साधिकेला म्हणाले, ‘‘दत्तगुरूंना माझा नमस्कार सांगा. श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार सांगा.’’ त्या वेळी ‘ते तसे का म्हणाले ?’, हे माझ्या लक्षात आले नाही. नंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संगणकीय प्रणालीद्वारे मी पहात होते. कार्यक्रमात ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप संपल्यानंतर सूत्रसंचालक श्री. विनायक शानभाग यांनी सांगितले, ‘‘सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणार आहेत.’’ तेव्हा सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे शब्द आठवले आणि ‘त्यांच्या माध्यमातून भगवंताने संकेत दिला होता’, असे माझ्या लक्षात आले.

मी रात्री सद्गुरु डॉ. पिंगळे यांना हे सांगितले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘विश्वमनातून सर्व येत असते. गुरुदेवांच्या कृपेमुळे हे कळते.’’ यातून ‘संतांची सर्वज्ञता आणि अहंशून्यता कशी असते ?’, हे मला शिकायला मिळाले.’

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (१४.७.२०२२)

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पाद्यपूजेच्या वेळी त्यांच्या ठिकाणी दत्तगुरूंचे दर्शन होणे

‘१३.७.२०२२ या दिवशी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची पाद्यपूजा करत होत्या. त्या वेळी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ठिकाणी दत्तगुरूंचे दर्शन झाले.

२. ‘सनातनचे तीनही गुरु वेगवेगळे नसून एकरूप आहेत आणि दत्तगुरुच आहेत’, असे जाणवणे

ज्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दोन्ही बाजूंना उभ्या होत्या, त्या वेळी ‘हे तीनही गुरु वेगवेगळे नसून एकरूप आहेत अन् दत्तगुरुच आहेत’, असे मला जाणवले. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणजे ब्रह्मा, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणजे श्रीमहाविष्णु आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणजे महेश आहेत’, असे मला जाणवले.

३. ‘तीनही मोक्षगुरु अंतःप्रेरणेने साधकांमध्ये कृतीशीलता निर्माण होण्यासाठी चैतन्य आणि आवश्यक ते ज्ञान प्रदान करत आहेत’, असे वाटून भावजागृती होणे

श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून इच्छाशक्ती, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या माध्यमातून क्रियाशक्ती आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या माध्यमातून ज्ञानशक्ती सर्वत्रच्या साधकांकडे प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. ‘या माध्यमातून तीनही गुरु अंतःप्रेरणेने साधना करण्यासाठी साधकांमध्ये कृतीशीलता निर्माण होण्यासाठी चैतन्य आणि आवश्यक ते ज्ञान साधकांना प्रदान करत आहेत’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.

४. पुरोहित साधक मंत्रपठण करत असतांना त्यांच्या ठिकाणी मला ३ वेळा दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवले. 

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पाद्यपूजा चालू असतांना ‘पूजन स्वतःच्या अंतरातच चालू आहे’, असे जाणवून शांत वाटणे आणि त्या वेळी स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव न रहाणे

ज्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची पाद्यपूजा चालू होती, त्या वेळी ‘हे पूजन माझ्या अंतरातच चालू आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा मला आतून शांत वाटत होते. त्या वेळी मला केवळ माझ्या श्वासोच्छ्वासाची जाणीव होती. ‘आजूबाजूला काय चालू आहे ?’, याचे मला भान नव्हते. तेव्हा मला स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव नव्हती. मला केवळ श्वास आणि प.पू. गुरुदेवांचे चरण यांचीच जाणीव होती.

६. ‘पाद्यपूजा चालू असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चरण हळूहळू विशाल होत गेले आणि संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या चरणांनी व्यापले गेले’, असे मला जाणवले.

७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांवर होत असलेल्या पुष्पार्चनेच्या वेळी पुरोहित साधक मंत्रांचे उच्चारण करत असतांना प्रचंड प्रमाणात शक्ती ग्रहण होत असल्याचे जाणवून ध्यान लागणे

सप्तर्षींच्या आज्ञेने १०८ वेळा ‘ॐ ऐं क्लिं श्रीं श्रीं श्रीं सच्चिदानंद परब्रह्मणे नमः ।’, हा मंत्रघोष करत श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांवर पुष्पार्चना करत होत्या. त्या वेळी ‘पुरोहित साधक मंत्रांचे उच्चारण करत असतांना प्रचंड प्रमाणात शक्ती ग्रहण होत आहे’, असे मला जाणवत होते. त्यामुळे मध्ये मध्ये माझे ध्यान लागत होते.

८. ‘गुरुतत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे ते माझा संपूर्ण देह आणि पेशी यांमध्ये कार्यान्वित होत आहे’, असे मला जाणवत होते.

९. भावावस्था जाणवणे आणि शांतीची अनुभूती येणे

संपूर्ण कार्यक्रमामध्ये माझी भावावस्था होती. त्या वेळी मी आतून शांतता अनुभवली. कार्यक्रमानंतरही ही स्थिती तशीच टिकून होती. माझे मन निःशब्द झाले होते. ‘काहीही न बोलता केवळ शांती अनुभवावी’, असे मला वाटत होते.

१०. या लिखाणाचे टंकलेखन करत असतांना मला चंदन आणि अष्टगंध यांचा सुगंध आला.

‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच हे सर्व अनुभवता आले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘गुरुदेवा, ‘या अपात्र जिवावर भरभरून कृपेचा वर्षाव केला’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (१४.७.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक