रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या युवा साधना शिबिरात गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील कु. समृद्धी धुळाज (वय २० वर्षे) यांना शिकायला मिळालेली सूत्रे

१. ग्रंथवाचनाची योग्य पद्धत समजणे

‘शिबिरात ‘ग्रंथांचा अभ्यास करण्यापूर्वी काय करायला हवे ?’, हे सांगितल्यावर मला ग्रंथवाचनाची योग्य पद्धत कळली, उदा. ग्रंथ वाचण्यापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करणे; ग्रंथ वाचतांना समवेत एक वही ठेवणे, जेणेकरून महत्त्वाची सूत्रे आणि मनातील शंका लिहिता येतील अन् त्याविषयी उत्तरदायी साधकांना विचारून त्यांचे निरसन करता येईल. असे केल्याने ग्रंथातील विषयांचे चैतन्याच्या स्तरावर आकलन होते.

२. वेळेचे नियोजन करण्याचे महत्त्व लक्षात येणे

शिबिरात ‘वेळेचे नियोजन कसे करावे ? आध्यात्मिकदृष्ट्या वेळेचे महत्त्व काय आहे ? आपले आयुष्य मर्यादित आहे. त्यामुळे आपल्याकडे साधनेसाठी अल्प वर्षे आहेत. आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची आहे. त्यामुळे एकेका क्षणाचा साधनेसाठी उपयोग करायला हवा’, हे लक्षात आले.

३. सेवा किंवा काम करतांना समयमर्यादा घालायला हवी. त्यामुळे सेवेची फलनिष्पत्ती वाढते.

४. सेवेचे प्राधान्य ठरवता येणे

एखादी सेवा आल्यावर तिचे प्राधान्य उत्तरदायी साधकांना विचारून ठरवावे. त्याप्रमाणे आपल्या वेळापत्रकात थोडाफार पालट करू शकतो.’

– कु. समृद्धी धुळाज, गडहिंग्लज, कोल्हापूर. (१७.११.२०२१)

कु. समृद्धी धुळाज यांना पू. सौरभ जोशी यांच्या भेटीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

१. ‘पू. सौरभदादा (सनातनचे ३२ वे विकलांग संत पू. सौरभ जोशी) प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी असतात. ते स्वतः आनंदी राहून इतरांनाही तेवढाच आनंद देतात.

२. पू. सौरभदादांना भेटल्यावर ‘आपण गुरुकृपेच्या बळावर त्रासाशी लढू शकतो’, हे मला शिकायला मिळाले.

३. साधिकेच्या मनातील विचार ओळखून अचूक उत्तर देणे : आम्ही पू. सौरभदादांशी जे बोलत होतो, त्याचे ते एका शब्दात आणि अचूक उत्तर देत होते. ‘माझ्या मनात काय चालू आहे ?’, हे त्यांना समजत होते आणि त्यांनी त्याचे उत्तरही दिले.‘त्यांना सूक्ष्मातून काहीतरी जाणवत आहे किंवा कळत आहे’, असे मला वाटले.

४. ‘त्यांची अंतर्मनातून साधना चालू आहे’, असे मी अनुभवले.’

– कु. समृद्धी धुळाज, (१७.११.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.