पोलिसांकडे तक्रार करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप
म्हापसा, २४ जुलै (वार्ता.) – सांगोल्डा येथील एका कुटुंबियांच्या सदस्याचे वर्ष १९७६ मध्ये निधन झाले आहे; मात्र संबंधित मृत व्यक्तीच्या नावाने व्यक्ती मृत झाल्यानंतर २४ वर्षांनी ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ (अधिकारपत्र) करून भूमी बळकावल्याचे उघड झाले आहे. ही घटना उघडकीस आल्यावर भूमीचे मूळ मालक अचंबित झाले असून आता त्यांना न्याय मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. या प्रकरणातील एका भूमीची विक्रीही झालेली असतांनाही संबंधित संशयिताच्या विरोधात कोणतीच कारवाई झालेली नसल्याचे पीडित कुटुंबियांचे म्हणणे आहे. या भूमीच्या मूळ मालकाचा नातू केथ फेरेरा आणि त्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वी संबंधित प्रकरणाविषयी प्रारंभी पोलीस उपअधीक्षकांकडे तक्रार नोंदवली होती; मात्र पोलिसांकडून तक्रारदारांना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. (अशा पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी ! पोलिसांचे आणि भूमी माफियांचे साटेलोटे होते का ? याचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक) यानंतर तक्रारदारांनी भूमी बळकावल्याच्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष अन्वेषण पथकाकडे यासंबंधी तक्रार नोंदवली आहे.
केथ फेरेरा यांच्या कुटुंबियांनी तक्रारीत नमूद केलेल्या माहितीनुसार घराचा मूळ मालक डायगो डिसा यांना कायद्यानुसार १५ वारसदार आहेत. मालक डायगो डिसा यांची सांगोल्डा गावात सर्व्हे क्रमांक ७३/३२, ७३/३३ आणि ७९/२० येथील भूमी बळकावण्यात आली. मूळ मालकाच्या एका भावाने ‘मूळ मालक डायगो डिसा यांना कोणीही वारसदार नाही’, असे सांगून बनावट पद्धतीने ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ (अधिकारपत्र) आणि प्रतिज्ञापत्रे सिद्ध करून ती म्हापसा मामलेदार कार्यालयात सुपुर्द केली. यानंतर भूमी स्वत:च्या नावे करून ती विकली. याविषयी मूळ मालकांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये केथ फेरेरा यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने म्हापसा न्यायालयात संशयितांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार नोंदवली; मात्र तरीही तक्रारदारांना न्याय मिळू शकला नाही. या काळात तक्रारदारांना संशयितांकडून जिवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत. विशेष अन्वेषण पथक या प्रकरणी न्याय देणार, अशी आशा केथ फेरेरा यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.