वैद्यकीय अधिकार्‍यांचे वेतन नियमित न झाल्यास आंदोलन ! – महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांना निवेदन देतांना महाराष्ट्र राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेचे आधुनिक वैद्य

कोल्हापूर, २३ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांचे वेतन गेल्या वर्षभरात कधीच वेळेवर झालेले नाही. सध्या नियमित वैद्यकीय अधिकार्‍यांपैकी ४० अधिकार्‍यांचे ‘मे’पासूनचे वेतन प्रलंबित आहे, तसेच कंत्राटी २५ वैद्यकीय अधिकार्‍यांना फेब्रुवारीपासूनचे वेतन मिळालेले नाही. वेतन प्रलंबित असल्याने विविध कारणांसाठी काढलेल्या कर्जाच्या संदर्भात बँकेकडून सतत मानहानी सहन करावी लागत आहे. या संदर्भात वारंवार लेखी निवेदन देऊनही त्यात पालट झालेला नाही. तरी या संदर्भात प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न केल्यास आम्ही २५ जुलैपासून आंदोलन करणार आहोत, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांना २२ जुलै या दिवशी दिले. या प्रसंगी विविध आधुनिक वैद्य उपस्थित होते.