|
सोलापूर, २३ जुलै (वार्ता.) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा नियंत्रकांनी परीक्षा व्यवस्थापनामध्ये झालेल्या घोडचुकांचे नैतिक दायित्व घ्यावे, तसेच त्यांना हे दायित्व पेलवत नसल्यास त्यांनी परीक्षा नियंत्रक पदाचे त्यागपत्र द्यावे. परीक्षांमधील त्रुटींमध्ये सुधारणा न झाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापिठावर मोठ्या संख्येचा मोर्चा काढेल, अशी चेतावणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंयोजक मयूर जव्हेरी, प्रदेश सहमंत्री रोहित राऊत, महानगर सहमंत्री आदित्य मुस्के, तसेच यज्ञेश डांगरे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेली सूत्रे
१. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ‘बहुपर्याय’ पद्धतीने परीक्षा घेण्याचे विद्यापिठाने घोषित केले होते; मात्र पहिल्याच दिवशी ‘पर्याय’ नसणारी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. ही चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर विद्यापिठाने ऐनवेळी दुसरी प्रश्नपत्रिका सिद्ध करून विद्यार्थ्यांना दिली.
२. विद्यापीठ अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या ‘सिव्हिल’ अभ्यासक्रमामध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना ‘पेव्हमेंट’ विषयाची प्रश्नपत्रिका विद्यापिठामध्ये उपलब्ध नव्हती. परीक्षेच्या दिवशी विद्यापिठाकडे ‘कॉलेज कॅम्पस’ने प्रश्नपत्रिका मागितल्यानंतर ही चूक विद्यापिठाच्या लक्षात आली. त्यानंतर ऐनवेळी प्राध्यापकांकडून ही प्रश्नपत्रिका सिद्ध करून घेऊन परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात आली.
३. विद्यापिठाने ‘बीएस्सी’च्या विद्यार्थ्यांना हस्तलिखित स्वरूपाची प्रश्नपत्रिका दिली, तर ‘बीए’ मराठीच्या द्वितीय वर्षामध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी झालेल्या परीक्षांची प्रश्नपत्रिका आहे तशीच देण्यात आली.
४. एकीकडे विद्यापिठाच्या परीक्षेतील गोंधळ चालू असतांना कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस या ‘उत्कृष्ट विद्यापिठा’चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी इंग्लंडला गेल्या आहेत. वरील घटना पहाता विद्यापिठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळणे तात्काळ थांबवावे.
संपादकीय भूमिकापरीक्षांमध्ये घोडचुका करणार्या विद्यापिठातील संबंधितांना बडतर्फ करायला हवे ! |