लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड करण्याची शिफारस
नवी देहली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगत १२ खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘शिवसेनेच्या १९ पैकी १८ खासदारांचा मला पाठिंबा आहे’, असा दावा करत लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड करण्याची शिफारस बिर्ला यांच्याकडे केली. सध्या खासदार विनायक राऊत हे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या समवेत आहेत.
१. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर ते थेट लोकसभेच्या सभापतींकडे गेले.
२. एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडेही जाणार असून तेथे ते शिवसेना पक्षावर दावा सांगणार आहेत.
३. शिवसेनेचे बंडखोर खासदार कृपाल तुमाने, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राजेंद्र गवित, सदाशिव लोखंडे, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव आणि हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहली येथे भेट घेतली.
४. शिंदे गटाने १८ जुलै या दिवशी मुंबई येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी विसर्जित केली.
५. शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांनी शिंदे यांना पाठिंबा देऊन लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ खासदारांना केंद्र सरकारने ‘वाय प्लस’ सुरक्षा प्रदान केली आहे.
६. ‘शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी मूळ पक्ष (उद्धव ठाकरे, शिवसेना) सोडला आहे. या संख्येच्या आधारे शिंदे गटाने ‘आमच्याकडे दोन तृतीयांश लोकप्रतिनिधी असल्याने खरी शिवसेना आमचीच आहे’, असा दावा केला आहे.