श्री भवानीदेवीचे सायंकाळचे अभिषेक चालू !

श्री तुळजाभवानी मंदिर

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), ७ जुलै (वार्ता.) – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने  ७ जुलैपासून सायंकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत अभिषेक पूजा चालू केली, अशी माहिती माजी नगराध्यक्ष आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त सचिन रोचकरी यांनी दिली आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानीदेवीचे नियमित सकाळी आणि सायंकाळी अभिषेक होत असत. कोरोना संसर्गाच्या कारणास्तव दोन्ही वेळेचे अभिषेक बंद करण्यात आले होते.

तुळजापूर तालुक्याचे भाजपचे आमदार आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारानंतर सकाळच्या वेळेतील अभिषेक चालू करण्यात आले होते. अनेक भाविक आणि पुजारी यांनी वारंवार श्री तुळजाभवानीमातेचे सायंकाळचेही अभिषेक नियमित चालू करण्याची मागणी केली होती. सायंकाळच्या अभिषेकासाठी ७ जुलैपासून दुपारी ३ नंतर भाविकांना ‘ऑनलाईन बुकींग’ करता येईल, अशी माहिती सचिन रोचकरी यांनी दिली.