इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक नाहीत ! – संशोधनाचा निष्कर्ष

इलेक्ट्रिक वाहन (प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी देहली – इलेक्ट्रिक वाहने पर्यायवरणपूरक नाहीत, असे एका संशोधनाच्या निष्कर्षातून समोर आले आहे. या निष्कर्षामध्ये म्हटले आहे की, एका इलेक्ट्रिक चारचाकी गाडीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल भूमीतून काढतांना ४ सहस्र २७५ किलो कचरा आणि किरणोत्सर्गी अवशेष निर्माण होतात.

१. जर इलेक्ट्रिक वाहन कोळशावर चालणार्‍या विजेवर भारित (चार्ज) करून दीड लाख किलोमीटर चालवली, तर पेट्रोलवरील गाडीपेक्षा केवळ २० टक्के कमी कार्बन निर्माण होईल. भारतात ७० टक्के वीज कोळशापासून निर्माण होते.

२. ऑस्ट्रेलियामध्ये केलेल्या संशोधनानुसार ३ सहस्र ३०० टन लिथियम कचर्‍यापैकी केवळ २ टक्के पुनर्वापर केला जातो, तर ९८ टक्के प्रदूषण पसरवते. लिथियम हा जगातील सर्वांत हलका धातू आहे. यामुळे हे इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरले जाते. लिथियमचा पर्यावरणपूरक म्हणून गौरव केला जातो; परंतु ते भूमीतून काढणे पर्यावरणासाठी ३ पट अधिक विषारी आहे.

३. संशोधकांच्या मते, जगात सुमारे २०० कोटी वाहने आहेत. यातील केवळ १ कोटी वाहने इलेक्ट्रिक आहेत. जर सर्व २०० कोटी वाहने इलेक्ट्रिक झाली, त्या निर्माण करतांना होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध नाहीत.