आजपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात

प्रतिकात्मक छायाचित्र’

मुंबई – पाणीपुरवठा करणार्‍या तलाव क्षेत्रात पाणीसाठा अल्प असल्याने मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.   त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महापालिका आणि इतर गावे यांना करण्यात येणार्‍या पाणी पुरवठ्यातही १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

यंदाचा पावसाळा चालू होऊनही मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत अल्प पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून मासात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे ७० टक्के अल्प पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ सहस्र ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत सर्व सात जलाशयांमध्ये मिळून केवळ १ लाख ४१ सहस्र ३८७ दशलक्ष लिटर म्हणजे ९.७७ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. चांगला पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत ही पाणी कपात लागू असणार आहे.