ठाणे, २६ जून (वार्ता.) – शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचे काही ठिकाणी समर्थन केले जात आहे, तर काही ठिकाणी शिंदे यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी एक संदेश प्रसारित केला आहे. ‘प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या. महाविकास आघाडीचा खेळ ओळखा. महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना आणि शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरीता समर्पित आहे. आपला एकनाथ संभाजी शिंदे’, असे यात म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे येथून पहिले त्यागपत्र
‘मागील अडीच वर्षांपासून आपल्या संघटनेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गळचेपी होत आहे. त्याचा निषेध म्हणून मी जिल्हाप्रमुख पदाचे त्यागपत्र देत आहे’, अशी घोषणा शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ट्वीट करून केली. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेना पक्षातील हे पहिलेच त्यागपत्र आहे. नरेश म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपद सोडल्यामुळे शिवसेनेसाठी हा पहिला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पुढे ‘शिवसैनिक होतो, आहे आणि रहाणारच’, असा निर्धारही व्यक्त केला आहे.