शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल; मात्र आमदारांनी २४ घंट्यांत मुंबईत यावे ! – खासदार संजय राऊत

मुंबई – शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी आमदारांची इच्छा असेल, तर आम्ही बाहेर पडू; मात्र शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी २४ घंट्यांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी, असे आवाहन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल; मात्र त्याआधी आमदारांनी मुंबईत येण्याचे धैर्य दाखवावे, असेही आवाहन त्यांनी केले. या वेळी शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी सूरत येथून स्वतःची सुटका कशी करून घेतली ? याची माहिती दिली.

शिवसेनेचे २१ बंडखोर आमदार संपर्कात !

पत्रकारांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले, ‘‘व्हॉट्सॲपद्वारे उपाहारगृहामधील छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवण्यापेक्षा आमदारांनी प्रत्यक्षात येऊन आमच्याशी चर्चा करावी. गौहत्ती येथील २१ आमदार आमच्या संपर्कात आहेत. राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे २० ते २५ आमदार पुन्हा शिवसेनेत येतील, असा आम्हाला विश्वास आहे.’’

भाजपचा आम्हाला पाठिंबा ! – एकनाथ शिंदे

भाजपने आपल्याला पाठिंबा दिला आहे. विजय आपलाच आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष त्याचे आपल्याला साहाय्य होईल. भाजपने आपल्याला ‘तुम्ही घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा तुम्हाला साहाय्य करू’, असे आश्वासन दिले आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी शिंदे यांनी भाजपसमवेत जाण्याची घोषणा केली. दुसरीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनीही ‘एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल’, असे सांगत शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली.

एकनाथ शिंदे यांच्या गटात अपक्षांसह ४२ आमदार

मुंबई/गौहत्ती – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात अपक्षांसह एकूर ४२ आमदार असल्याचे छायाचित्र २३ जूनला सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाले. हे शिंदे यांचे शक्तीप्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या मुंबईत पार पडलेल्या बैठकीत केवळ १७ आमदार उपस्थित होते.

एकनाथ शिंदे हे गटनेते नाहीत ! – विधानसभेचे प्रभारी (तात्पुरते) अध्यक्ष नरहरि झिरवाळ

कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांना गटनेता म्हणून घोषित केले. तसे पत्र आमच्याकडे आले आहे, तसेच प्रतोद नेमण्याचे दायित्व गटनेत्याकडे असते. एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेले पत्र मी पाहिलेले नाही, ते पाहून त्यावर विचार करून ‘प्रतोद कोण ? आणि गटनेता कोण ?’ याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभेचे उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष नरहरि झिरवाळ यांनी सांगितले.

सत्तेतील सर्व आमदारांना समान निधी दिला ! – अजित पवार

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘अजित पवार यांनी आमदारांना निधी दिला नाही’, अशा आशयाचा आरोप केला. त्याविषयी पत्रकारांशी बोलतांना पवार यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले की, काही मित्र पक्ष वेगळ्या प्रकारची माहिती देतात. सरकार अडीच वर्षांपूर्वी अस्तित्वात आले आहे. सत्तेतील सर्व आमदारांना समान निधी दिला आहे. मी दुजाभाव केला नाही. अशा काळात प्रत्येकाने आघाडी कशी टिकेल ? हे पहायला हवे. माध्यमांशी बोलण्यापूर्वी पटोले यांनी माझ्याशी थेट बोलायला हवे होते.

बंडामध्ये भाजपचा सहभाग अजून तरी दिसत नाही !

पवार पुढे म्हणाले की, शिंदे यांच्या बंडामध्ये भाजपचा सहभाग अजून तरी दिसत नाही. संजय राऊत यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे वक्तव्य का केले, हे त्यांनाच माहीत.

आम्ही त्याविषयी काहीही बोलणार नाही. आम्ही आता सामजंस्याने भूमिका घेऊन या समस्येतून बाहेर कसे पडायचे, ते पहात आहोत. या वक्तव्याविषयी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू.

सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्नरत राहील !  

सध्या वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. हे सरकार टिकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू. शिवसेनेत निर्माण झालेल्या पेचाविषयी त्यांच्या पक्षातील नेते भूमिका मांडतील. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ! – राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेनेचे आमदार फुटतील, अशी अपेक्षा नव्हती. मुंबईतील आमदार फुटले, याचे आश्चर्य वाटत आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले.

शिंदे गटाला राज्यात १३, तर केंद्रात २ मंत्रीपदे देण्याचा भाजपचा प्रस्ताव

भाजपने एकनाथ शिंदे गटासमोर राज्यात १३, तर केंद्रात २ मंत्रीपदे देण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे समजते. शिंदे यांना स्वत:चा वेगळा गट सिद्ध करण्यासाठी केवळ ३७ आमदारांची आवश्यकता होती; परंतु त्यांच्याकडे ४२ हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. शिंदे लवकरच आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना पाठवण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या ९ हून अधिक खासदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा : ४ खासदार गौहत्तीत !

दुसरीकडे शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी ९ हून अधिक खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांपैकी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, ठाणे येथील खासदार राजन विचारे, खासदार भावना गवळी आणि नागपूर येथील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हेही गौहत्ती येथे पोचले आहेत.

दिवसभरातील ठळक घडामोडी

१. आसाम राज्यातील गौहत्ती येथे शिवसेनेचे आणखी काही आमदार पोचले आहेत. आशिष जैस्वाल, दीपक केसरकर, सदा सरवणकर, योगेश कदम, मंजुळा गावित, मंगेश कुडाळकर, संजय राठोड यांचा त्यात समावेश आहे.

२. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार समवेत असल्याने एकनाथ शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्याच्या सिद्धतेत आहेत. निवडणूक आयोगाकडे ते तशी शिफारस करणार असल्याचे समजते.

३. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन’ असे फलक झळकत होते.

४. ‘बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर ५ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी’, अशी मागणी काँग्रेसने न्यायालयात केली.