द्वेषपूर्ण भाषणांच्या परिणामांतून काश्मीरमधील हिंदूंचे पलायन झाले ! – देहली उच्च न्यायालय

नवी देहली – द्वेषपूर्ण भाषणे नेहमीच एका समाजाला लक्ष्य करून केली जातात. यामुळे या समाजाच्या मनोदशेवर त्याचा परिणाम होतो. त्यांच्यात भीती निर्माण होते. अशा प्रकारची भाषणे संबंधित समाजावरील आक्रमणाचा पहिला टप्पा असतो. त्यानंतर बहिष्कार, पलायन करण्यास भाग पाडणे आणि मग वंशसंहारापर्यंत तो पोचतो. लोकसंख्येच्या आधारे समाजाला लक्ष्य केले जाते. अशा प्रकारच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत आणि घडत आहेत. यामुळे भौगोलिक लोकसंख्येतही पालट झाले आहेत. याचे प्रमुख उदाहरण काश्मीर खोर्‍यातील काश्मिरी हिंदूंचे पलायन आहे, असे प्रतिपादन देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी वर्ष २०२० मध्ये सुधारित नागरिकत्व विधेयकाच्या संदर्भात केलेल्या कथित चिथावणीखोर विधानांच्या प्रकरणी माकपच्या नेत्या वृंदा करात यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने वरील प्रतिपादन केले. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.