सातारा, ११ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील सातारा, कराड यांसह ७ नगरपालिकांच्या प्रभाग रचनांचा कार्यक्रम अंतिम झाला आहे. आता निवडणूक आयोगानेही आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार १३ जून या दिवशी त्या-त्या नगरपालिका क्षेत्रांत सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.
१३ जून या दिवशी जिल्ह्यातील सातारा, कराड, रहिमतपूर, म्हसवड, वाई, महाबळेश्वर, फलटण, पाचगणी आणि मेढा या नगरपालिकांचा आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे. सातार नरगरपालिकेच्या २५ प्रभागांची आरक्षण सोडत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काढण्यात येणार आहे. नागरिकांना हरकत घेण्यासाठी आरक्षणाची अधिसूचना १५ जून या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिकांच्या ‘वेबसाईट’वर प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सूचना आणि हरकती २१ जूनपर्यंत प्रविष्ट करायच्या आहेत. २९ जूनपर्यंत अधिसूचना अंतिम करून त्यास मान्यता द्यावयाची आहे. मान्यता मिळाल्यानंतर सदस्य पदाच्या आरक्षणाची अंतिम माहिती १ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिकांच्या ‘वेबसाईट’वर प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.