स्वतःच्या केवळ अस्तित्वाने साधक आणि मंगळुरू सेवाकेंद्र यांच्यात नवचैतन्य निर्माण करणारे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा (वय ४६ वर्षे) !

ज्येष्ठ शुक्ल नवमी (९.६.२०२२) या दिवशी सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) यांचा ४६ वा वाढदिवस आहे. १.९.२०२१ या दिवशी पू. रमानंदअण्णा दिवाळीनिमित्त मंगळुरू सेवाकेंद्रातून त्यांच्या गावी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत साधकांना झालेले त्रास आणि ते परत आल्यावर सेवाकेंद्रात झालेले पालट अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. रमानंद गौडा यांना ४६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. दिवाळीत दीपदेवतेच्या कृपेने सेवाकेंद्रातील साधकांमध्ये उत्साह आणि चैतन्य जाणवणे

पू. रमानंदअण्णा दिवाळीनिमित्त घरी गेले होते. दिवाळीच्या कालावधीत दीपदेवतेच्या कृपेने सेवाकेंद्रातील साधकांमध्ये उत्साह आणि चैतन्य जाणवत होते. साधकसंख्या अल्प असूनही सर्व साधक विविध सेवांमध्ये आनंदाने सहभागी झाले होते. त्यामुळे कुणालाही सेवांचा ताण आला नाही.

श्री. प्रशांत हरिहर

२. दिवाळीनंतर साधकांना आणि सेवाकेंद्रात जाणवलेले त्रास

२ अ. दिवाळीनंतर साधकांना शारीरिक त्रास होणे आणि त्यांवर उपाय करूनही विशेष परिणाम न होणे : दिवाळी झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून सेवाकेंद्रात त्रास जाणवू लागला. काही साधक रुग्णाईत झाले. अनेक साधकांना ‘अंगदुखी आणि ताप आल्यासारखे वाटणे’, असे शारीरिक त्रास झाले. त्यासाठी २ – ३ दिवस सर्व साधकांना काढा (औषधी वनस्पती घालून केलेले प्यायचे औषध) देण्यात आला; पण त्यामुळे काही विशेष परिणाम झाला नाही.

२ आ. सेवाकेंद्रात दाब जाणवत असल्यामुळे सर्वत्र धूप दाखवल्यावरही त्याचा परिणाम न होणे : त्या कालावधीत सेवाकेंद्रात दाब जाणवत होता. ‘सेवाकेंद्रात एक प्रकारचा ताण जाणवत आहे’, असे अनेक साधकांनी बोलून दाखवले. साधकांचा दिवाळीतील उत्साह उणावला होता. यावर उपाय म्हणून आश्रमात सर्वत्र धूप दाखवण्यात आला; पण त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही.

३. पू. रमानंदअण्णा सेवाकेंद्रात परत आल्यावर साधकांचे त्रास न्यून होणे आणि त्यांच्यात उत्साह निर्माण होणे

दिवाळीनंतर पू. रमानंदअण्णा सेवाकेंद्रात परत आल्यावर साधक त्यांना होणारे त्रास आणि ताण विसरून गेले. साधकांमध्ये पुन्हा दिवाळीसारखा उत्साह आला आणि ते पूर्ववत् सेवा करू लागले. यावरून ‘पू. रमानंदअण्णांच्या केवळ अस्तित्वाने सेवाकेंद्रातील साधकांचे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून झाले’, असे लक्षात आले. त्या वेळी माझ्याकडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. ‘येणाऱ्या आपत्काळात गुरुदेव संतांच्या माध्यमातून आपले रक्षण करणार आहेत’, याची प्रचीती आम्हा सर्वांना आली’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू सेवाकेंद्र (१९.११.२०२१)


साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देणारे पू. रमानंद गौडा !

१२.१२.२०२१ ते १६.१२.२०२१ या कालावधीत पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) कर्नाटकातील उडुपी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना मी त्यांच्या समवेत शिकण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. गुरुप्रसाद गौडा

१. संगीताविषयीचे ज्ञान असलेल्या बालसाधकांनी संगीत सादर केल्यावर त्यांना प्रसाद देऊन प्रोत्साहित करणे

विविध जिल्ह्यांतून साधकांची मुले शिबिरासाठी मंगळुरू सेवाकेंद्रात आली होती. त्यांना संगीताविषयीचे ज्ञान असल्याचे कळल्यावर पू. अण्णांनी तत्परतेने त्या सर्व मुलांना एकत्र केले आणि त्यांना ठाऊक असलेले संगीत प्रस्तुत करण्याविषयी सांगितले. त्यामुळे सर्व बालसाधक आपापली वाद्ये घेऊन आले. त्यांनी उत्तम रितीने संगीत सादर केले. ‘संगीताविषयी बालसाधकांना असलेले ज्ञान, त्यांचा मुग्धभाव आणि निरागसता’ पाहून पू. अण्णांनी त्यांना २ वेळा प्रसाद देऊन प्रोत्साहित केले. पू. अण्णांनी त्यांच्या कलेची प्रशंसा केली.

२. जिल्ह्यात चांगली सेवा करणाऱ्या साधकांना प्रसाद देऊन प्रोत्साहन देणे

पू. अण्णा जिल्ह्यात प्रसारासाठी जातात. तेव्हा पू. अण्णा तिथे चांगली सेवा करणाऱ्या साधकांचे प्रयत्न लक्षात घेऊन त्यांना प्रसाद देतात. त्यामुळे त्या साधकांचा कृतज्ञताभाव जागृत होतो आणि त्यांना प्रोत्साहन मिळते.

३. स्वतःसमवेत आलेल्या साधकांची काळजी घेणे

पू. अण्णा जिल्ह्यामध्ये जातांना काही साधकांना त्यांच्या समवेत शिकण्यासाठी घेऊन जातात आणि त्या साधकांना विविध प्रसंगांतून शिकवतात. ते त्यांच्या समवेत असलेल्या साधकांचे जेवण आणि शारीरिक त्रास यांची काळजी घेतात. ते साधकांच्या कुटुंबियांची विचारपूस करतात.

४. पू. अण्णांनी जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना सेवाकेंद्रात येण्यासाठी निमंत्रण देणे अन् त्यांनी सेवाकेंद्रात येण्याची इच्छा व्यक्त करणे

पू. अण्णा जिल्ह्यात संपर्काच्या वेळी भेटलेले जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना सेवाकेंद्रात येण्याचे निमंत्रण देतात. ते त्यांना तेथील चैतन्यमय वातावरणाविषयीही सांगतात. त्यामुळे अनेक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी सेवाकेंद्रात येण्याची इच्छा व्यक्त करतात. ते येथे येऊन साधनेविषयी समजून घेतात. यावरून ‘संतांची प्रेमळ वाणी धर्मप्रेमींच्या मनामध्ये सेवाकेंद्रात तत्परतेने जाण्याची इच्छा निर्माण करते आणि ते साधनेला प्रारंभ करतात’, असे माझ्या लक्षात आले.

‘संतांनी शिकवलेले प्रत्येक सूत्र आम्हा सर्वांकडून कृतीच्या रूपात साकार होऊ दे. हे प्रयत्न करण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी आणि शक्ती लाभू दे’, अशी त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे. संत प्रीतीचा सागर असतात. प्रीतीनेच ते संपूर्ण जग जिंकतात. ‘अशा संत-महात्म्यांचा सत्संग श्री गुरूंच्या कृपेने अनुभवायला मिळत आहे’, याबद्दल त्यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), मंगळुरू (२२.१२.२०२१)

• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक