हिदूंचे धर्मांतर करण्याची ख्रिस्ती धर्मप्रचारकांची कुटील पद्धत !

हिंदूंच्या धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांकडून वापरण्यात येणाऱ्या कुटील पद्धती रोखण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आणि हिंदु राष्ट्र आवश्यक !

‘ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कुटील पद्धती वापरून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात गरीब, वनवासी, तसेच भोळ्या हिंदूंना वेगवेगळी प्रलोभने दाखवून त्यांच्या मनात हिंदु धर्म आणि देवता यांच्याविषयी भ्रम किंवा घृणा निर्माण केली जाते अन् त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. सध्या अशाच काही कुटील पद्धतींचा वापर करून हिंदूंच्या धर्मांतराचा कसा प्रयत्न चालू आहे, हे पुढील काही उदाहरणांवरून लक्षात येईल.

१. हिंदूंच्या देवता आणि येशू ख्रिस्त एकच असल्याचे भासवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांसारख्या भागांत गेल्यावर काही ठिकाणी ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचे लक्षात आले. अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा ‘हरिनाम सप्ताह’ असतो. त्या माध्यमातून समस्त हिंदूंमध्ये जागृती होते. त्यातून धर्म, परंपरा, अध्यात्म यांचा प्रसार केला जातो; परंतु महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी ‘येशू हरिनाम सप्ताह’ चालू केला आहे. काही ठिकाणी ‘येशू ख्रिस्त आणि कृष्ण एकच आहेत’, असे सांगितले जाते. हिंदूंना भूलवण्यासाठी काही ठिकाणी ‘श्री गणेश येशू मंदिरात श्री सत्यनारायण पूजा’, अशी पत्रके वितरित केली जातात. मंदिरे, सत्यनारायण पूजा, हे हिंदूंशी संबंधित असल्याने हिंदूंना वाटते, ‘हे आपलेच आहेत.’

श्री. सुनील घनवट

२. वनवासी बांधवांना हिंदु धर्मापासून दूर करून त्यांचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र !

वनवासी (आदिवासी) लोकांना ‘तुम्ही हिंदु नाहीत’, असे सांगून त्यांना हिंदूंपासून वेगळे करण्याचा डाव आखला जात आहे. (मुळात ‘आदिवासी’ हा शब्द ब्रिटिशांनी वर्ष १९३० मध्ये अस्तित्वात आणला. ‘आदिवासी’ हे मूळ हिंदूच असून ते वनात रहात असल्यामुळे त्यांचा ‘वनवासी’ असा उल्लेख केला जातो.) त्यामुळे अनेक वनवासी लोकांनी स्वतःच्या घरातील देवतांच्या प्रतिमा विसर्जन करून ते धर्मांतरित झाले आहेत. ‘राम आमचे दैवत नसून रावण आमचे दैवत आहे’, अशी त्यांची मानसिकता सिद्ध केली जात आहे. हेच वनवासी बांधव किंवा पुरो(अधो)गामी मंडळी दसऱ्याला होणाऱ्या रावणदहन प्रथेला विरोध करू लागले आहेत.

३. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांचा सीमावर्ती भाग मिळून ‘भिल्लस्तान’ निर्माण करण्याचे षड्यंत्र !

अशा भागांत हिंदु धर्माचा प्रसार करण्यात हिंदू अल्प पडत आहेत. याचा अपलाभ उठवत वनवासींना धर्मांतरित करून हिंदु धर्मात फूट पाडली जात आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि तेथील नंदुरबार जिल्हा यांचा सीमावर्ती भाग मिळून एक ‘भिल्लस्तान’ निर्माण करण्याची मागणी जोर धरत आहे. येथे आदिवासी समाजबांधवांना हिंदु धर्मापासून दूर करण्याचे षड्यंत्र असल्याचे लक्षात आले.

४. मोठमोठ्या शहरात प्रार्थनासभा घेण्यासाठी ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून अधिक भाडे देऊन कार्यालये घेण्याचा प्रकार !

पुणे, मुंबई, ठाणे, रायगड आणि अन्य ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी तेथील सभागृहांच्या मालकांना अधिक भाडे देण्याचे आमीष दाखवून कार्यालये मिळवतात अन् तेथे प्रार्थनासभा घेतात. अशा वेळी कार्यालयाच्या मालकांनी ‘पैसे अल्प मिळाले, तरी चालतील; पण समाजात फूट पाडणारे असे कार्यक्रम घ्यायचे नाहीत’, अशी भूमिका घेतली पाहिजे. पुण्यात नामांकित सभागृहांमध्येही वरील प्रकार अनुभवण्यास आला. नंतर सभागृह मालकांना ख्रिस्त्यांचा हा डाव लक्षात आल्यावर त्यांनी त्यांचे कार्यालय देण्यास नकार दिला. असे हिंदु धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे.

५. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे भरकटत चाललेला हिंदु समाज !

५ अ. अनेक हिंदू शहरातील दर्ग्यांमध्ये किंवा ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतांना दिसणे : संपर्क अभियानाच्या निमित्ताने एका राज्यात गेल्यावर लक्षात आले, ‘अनेक हिंदू देवतांना नमस्कार करणे, मंदिरात जाणे यांपेक्षा धर्मांधांच्या भूलथापांना बळी पडून दर्गे, पीर अशा ठिकाणी नवस किंवा प्रार्थना करायला जातात. ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. एका जिल्ह्यातील काही हिंदुत्वनिष्ठांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘आमच्या शहरातील दर्ग्यांत हिंदूच अधिक जातांना दिसतात. तुम्ही तुमच्या (हिंदु जनजागृती समितीच्या) कार्यक्रमांमध्ये याविषयी प्रबोधन करा.’’ धर्मशिक्षण नसल्याने आपल्या देवतांचे महत्त्व लक्षात न घेता अन्य धर्मातील प्रार्थनास्थळी जाणे, म्हणजे एक प्रकारचे वैचारिक धर्मांतर आहे. आपल्या ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे ‘स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्माे भयावहः ।।’ (अर्थ : आपल्या धर्मात मरणेही कल्याणकारक आहे; पण दुसऱ्याचा धर्म भयावह आहे.) हे लक्षात घेऊन हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते.

५ आ. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या आस्थापनांकडून चर्चमध्ये जाण्यास आणि नमाज पढण्यास अनुमती मिळणे; परंतु हिंदु युवकांना त्यांच्या धर्मातील कृती करण्याची अनुमती देण्यास अनास्था दाखवणे : ‘ख्रिस्ती नववर्षाच्या म्हणजे १ जानेवारीच्या निमित्ताने पुष्कळ आस्थापनांमधील कर्मचारी चर्चमध्ये जातात’, असे तेथे काम करणाऱ्या काही धर्माभिमानी हिंदूंनी सांगितले. आस्थापनेही त्यास मज्जाव करत नाहीत. अनेक आस्थापनांमध्ये प्रत्येक शुक्रवारी नमाजपठण करण्यासही अनुमती दिली जाते; परंतु हिंदु युवकांनी स्वतःच्या धर्मातील कृती करण्याची अनुमती मागितली, तर कमालीची अनास्था दाखवली जाते.

५ इ. संस्कृती आणि परंपरा यांचे पालन न केल्याने घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले असणे : कौटुंबिक न्यायालयात अधिवक्त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘सध्या आमचा व्यवसाय वाढला आहे.’’ याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘सध्याच्या काळात मुलगा आणि मुलगी दोन्ही नोकरी करत असल्याने एकमेकांकडून समानतेची वागणूक मिळण्याची अन् घरकामात दोघांनी मिळून साहाय्य करण्याची अपेक्षा असणे, तसेच भ्रमणभाषचा सतत वापर, एकमेकांना भ्रमणभाषचा संकेतांक (पासवर्ड) न देणे, या आणि अशा अनेक कारणांमुळे पती-पत्नींमधील वाद विकोपाला जाऊन घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे.’’ संस्कृती आणि परंपरा यांचे पालन न केल्याने घटस्फोटांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्वांवर उपाय एकच म्हणजे ‘देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करून हिदूंचे संघटन करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे.’

– श्री. सुनील घनवट, राज्यसंघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती. (७.२.२०२०)