शेतात आध्यात्मिक उपाय करून सर्वकाही श्रीकृष्णावर सोपवल्यावर आलेल्या अनुभूती !

१. रात्री जनावरे आल्यास उठवण्याविषयीची श्रीकृष्णाला प्रार्थना करून झोपणे आणि प्रत्यक्षातही जनावरे आल्यावर डुकरांच्या ओरडण्यामुळे जाग येणे

श्री. ज्ञानेश्वर गावडे

एप्रिल-मे २०१२ मध्ये मी शेतात सनातन-निर्मित उदबत्तीची विभूती मिसळून भातपेरणी केली. खतामध्ये आणि संपूर्ण शेतात विभूती पसरली. त्यानंतर भाताची रोपणी केली. शेतामध्ये सर्वत्र खोक्यांचे उपाय केले. रात्री मी शेतामधील घरात झोपायला गेल्यावर सूक्ष्मातून सर्व खोक्यांना उदबत्ती दाखवली आणि श्रीकृष्णाला प्रार्थना करून सांगितले, ‘जनावरे आल्यावर मला उठव.’ प्रत्यक्षातही जनावरे आल्यावर कुंपणाच्या कडेला डुकरे येऊन भांडण करत होती. त्यांच्या ओरडण्यामुळे जाग आली.

२. रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर शेताच्या भोवती सुदर्शनचक्र फिरत असल्याचे दिसणे

भाताची लागवड (पेरणी) करण्यास २ दिवस लागणार होते. सर्वांनी नामजप करत पेरणी केल्याने एकच दिवस लागला. रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर ‘त्याचे सुदर्शनचक्र शेताच्या भोवती फिरत आहे’, असे दिसत होते. आमच्या शेताच्या कडेला असणाऱ्या शेतामध्ये रानटी जनावरे येऊन भात खात होती. तेव्हा लोकांनी मला विचारले, ‘जनावरे तुमचे शेत का खात नाहीत ?’ मी त्यांना आध्यात्मिक उपायांविषयी सांगितले; पण त्यांना खरे वाटत नव्हते.

३. सर्व पिकांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि दैवी नाद ऐकवल्याने शेतामध्ये जनावरे न येणे

‘भातही सजीव आहे’, असा भाव ठेवून मी शेतामध्ये सर्वत्र फिरून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि दैवी नाद सर्व पिकांना (भातशेतीला) ऐकवत होतो. तेव्हा ‘भातांनी या जन्मात भजने आणि दैवी नाद ऐकायला हवा. त्यांनी साधना केल्यास माझीही साधना होईल’, असे मला वाटत होते. सात्त्विक नादामुळे शेताची शुद्धी झाली. आमच्या शेतामध्ये जनावरे (गवे, म्हशी, रानडुक्करे) येत नव्हती; पण आमच्या शेतातून जाऊन ती जनावरे इतरांचे शेत खायची. कालांतराने ती आमच्या कडे येणे बंद झाले.

४. श्रीकृष्णाला प्रार्थना केल्याने अल्प मनुष्यबळ असतांनाही अर्ध्या दिवसात भाताची कापणी होणे

भात कापणीच्या वेळी एरव्ही १६ लोकांना एक दिवस लागतो. या वेळी १० लोकांनी अर्ध्या दिवसात कापणी केली. मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘तूच शेतात सेवा करत आहेस. ही सेवा तूच आमच्याकडून करवून घे.’ तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या शेताची अगोदरच कापणी केल्याचे जाणवले. आम्ही केवळ निमित्तमात्र होतो. श्रीकृष्णाला विचारले असता त्याने मला कौरव-पांडवांच्या युद्धाची आठवण करवून दिली. श्रीकृष्णाने कौरवांना आधीच मारले होते; पण पांडवांना निमित्त केले. त्याप्रमाणेच या प्रसंगात झाले.

– श्री. ज्ञानेश्वर आपाना गावडे, गवेगाळी, खानापूर, बेळगाव.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक