आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग १६)

पू. तनुजा ठाकूर

४. साम्यवाद्याच्या समवेत प्रवास करतांना आलेला अनुभव !

४ अ. साम्यवाद्याने साधना न करण्याचा सल्ला देणे आणि त्यांच्याशी कालीमातेविषयीच्या उपासनेविषयी बोलणे : एके दिवशी मी प्रवास करतांना जपमाळ घेऊन नामजप करत होते. माझ्या समवेत बसलेली साम्यवादी व्यक्ती मला बुद्धीभ्रष्ट करण्यासाठी साधना न करण्याचा सल्ला देत होती. मी नामजप करतांना त्या व्यक्तीला बोलण्यासाठी प्रोत्साहित करत होते. जेव्हा त्यांचे धर्माप्रतीचे विषारी विचारांचे फुत्कार बंद झाले. तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही तर पुष्कळच ज्ञानी आहात आणि तुम्ही सज्जनही वाटता. तुम्ही तर बंगाली आहात. मी ऐकले आहे की, येथील सर्व लोकांची कालीमातेवर पुष्कळ श्रद्धा आहे; परंतु तुम्ही साम्यवादी आहात. त्यामुळे तुमची निश्चितच तिच्याप्रती श्रद्धा नसणार; पण खरं सांगा, तुम्ही कालीमातेकडे कधीच काही मागण्यासाठी गेला नाहीत का ?’’

४ आ. साम्यवाद्याची अन्य साम्यवाद्यांनी दिशाभूल केल्याने ते धार्मिकतेविषयी कृतघ्न असणे आणि त्याविषयी त्यांना जाणीव करून दिल्यावर ते लज्जित होणे : ती व्यक्ती खरोखरच सज्जन होती; पण साम्यवाद्यांनी त्यांच्या विषारी विचारसरणीने तिची दिशाभूल केली होती. त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटले, ‘‘एकदा मी कालीमातेच्या दारात गेलो होतो. त्या वेळी माझी कन्या अत्यंत आजारी होती. अनेक वैद्यांनी सांगितले, ‘‘आता सर्व काही ईश्वराच्याच हातात आहे.’’ मी विचारले, ‘‘कालीमातेकडे जाऊन प्रार्थना केल्यावर तुमची कन्या बरी झाली का ?’’ ते ‘हो’ म्हणाले. तेव्हा मी पटकन म्हटले, ‘‘तुम्ही तर सज्जन वाटता, मग एवढे कृतघ्न कसे झालात ? कालीमातेने तुमच्या प्राणप्रिय कन्येला बरे केले आणि तुम्ही या साम्यवाद्यांच्या प्रभावाखाली आपल्या धर्माची निर्भत्सना करत आहात.’’ ते गप्प आणि लज्जितही झाले. कदाचित त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती.

५. रामराज्यात पुण्यवान लोक धर्मपालन करणार असणे

वास्तविक कलियुगात अतिबुद्धीवादी लोक एवढे झाले आहेत की, जर त्यांना दुःख झाले नसते, तर त्यांनी ईश्वराला मानलेच नसते. त्यामुळे पुढील ३-४ वर्षांमध्ये सर्व बुद्धीजीवी लोकांच्या बुद्धीची ‘ऐशी की तैशी’ होईल. रामराज्य आल्यावर जे कुणी पुण्यवान वाचतील, ते सर्व स्वतःच धर्मपालन करू लागतील. त्यामुळे काळजी करू नये. हिंदु राष्ट्रात महानगरातसुद्धा स्थानदेवतेची उपासना केली जाईल.

६. महानगरातील लोक धर्मपरायण झाल्यासच आपत्काळातील त्रासाची तीव्रता न्यून होऊ शकणे

धर्मनिष्ठांनी आपल्या स्थानदेवतेच्या दर्शनासाठी जावे. ते शक्य नसेल, तर घरातूनच स्थानदेवतेला प्रार्थना करावी; कारण भारताच्या सर्व महानगरांमध्ये भविष्यकाळात परमाणू बाँबचे आक्रमण होण्याची शक्यता काही संतांनी व्यक्त केली आहे; परंतु अजूनही वेळ आहे. जर महानगरातील लोक धर्मपरायण झाले, तर त्रासाची तीव्रता निश्चितच स्थानदेवता न्यून करू शकते.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)

हिंदु धर्मातील विविध आचारांमागील शास्त्र सांगणारी सनातनची ग्रंथमालिका उपलब्ध आहे !