मंगळुरू विश्‍वविद्यालयात हिजाब घालून येण्याची मुसलमान विद्यार्थिनींची कायदाद्रोही मागणी

(हिजाब म्हणजे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

मंगळुरू (कर्नाटक) – येथील मंगळुरू विश्‍वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात येण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे, ‘हिजाब आमच्या गणवेशाचाच एक भाग आहे.’ याला हिंदु विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.

१. कर्नाटक उच्च न्यायालयाने यापूर्वीच हिजाब घालणे ही इस्लामची धार्मिक प्रथा नसल्याचे सांगत याला अनुमती नाकारली होती. तरीही मुसलमान विद्यार्थिनी या निर्णयाला मानत नसल्याचे या घटनेवरून लक्षात येत आहे. याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विश्‍वविद्यालयाबाहेर निदर्शने केली. ‘४४ विद्यार्थिनी हिजाब घालून वर्गात येत आहेत’, असा दावा या संघटनेने केला आहे. तसेच ‘जर मुसलमान विद्यार्थिनींनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही, तर आम्हीही भगवे उपरणे घालून येऊ’, असे या संघटनेने म्हटले आहे.

२. विश्‍वविद्यालयाने २६ मे या दिवशी एक आदेश जारी करत विश्‍वविद्यालयाच्या परिसरात कुणालाही धार्मिक वेशभूषा करून येण्याला अनुमती देण्यात आलेली नाही, असे म्हटले आहे. मुसलमान विद्यार्थिनींनीही हे मान्य केले आहे की, त्यांना हिजाब घालण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. त्यांनी या प्रकरणी उपकुलगुरु आणि जिल्हाधिकारी यांच्याशीही चर्चा केली आहे, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटक उच्च न्यायालाने हिजाब घालण्याला अनुमती दिलेली नसतांना अशा प्रकारची मागणी करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमानच केला जात आहे, हे लक्षात घ्या !