नेहरू यांनी ब्रिटिशांचे ‘बी टीम’ म्हणून काम केले ! – आमदार अतुल भातखळकर, भाजप

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण !

डावीकडून राजेंद्र वराडकर, आमदार अतुल भातखळकर, पुरस्कार स्वीकारतांना सुभेदार संतोष राळे, प्रवीण दीक्षित, नीलेश देखणे, रणजित सावरकर

मुंबई, २५ मे (वार्ता.) – चीनच्या आक्रमणाच्या वेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेकडून विमाने आणि पायलटही मागवले. यावरून नेहरू यांची देशाच्या संरक्षणाविषयीची आस्था (?) दिसून येते. नेहरू यांनी ब्रिटिशांची ‘बी टीम’ म्हणून काम केले, असे गंभीर वक्तव्य भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त २२ मे या दिवशी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई एन्.सी.सी.चे प्रमुख (ग्रुप कमांडर) नीलेश देखणे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर हे उपस्थित होते.

या वेळी आमदार अतुल भातखळकर म्हणाले, ‘‘देशाच्या सीमा या शस्त्राने आखल्या जातात. ज्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, त्या देशात सरस्वती आणि लक्ष्मी नांदू शकत नाहीत, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितले; मात्र नेहरूंना हे पटले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराने चालणारे आहेत.’’

हिंदूंचे हित साधणार्‍या शासनकर्त्यांना निवडून द्यायला हवे ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

श्री. रणजित सावरकर

देशाची सीमा कागदोपत्री नाही, तर शस्त्राच्या सामर्थ्याने लिहिली जाते. सैनिकी सामर्थ्याचे महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे. दुर्दैवाने भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी भारताला सैन्यदलाची आवश्यकता नसल्याचे म्हटले. आपण आपला इतिहास विसरलो आहोत. हिंदू जात, प्रांत यांच्यात विभागला आहे. त्यामुळे शासनकर्ते हिंदूंकडे लक्ष देत नाहीत. देशाला सशक्त करायचे असेल, तर शासनकर्ते सक्षम असणे आवश्यक आहे. जे हिंदूंचे हित साधतील, अशा शासनकर्त्यांना निवडून द्यायला हवे.

…तर भारतासह आजूबाजूच्या देशांचेही भाग्य उजळेल ! – प्रवीण दीक्षित, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

श्री. प्रवीण दीक्षित

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हायचे नव्हते. त्यांची कुणाशीही स्पर्धा नव्हती. त्यांचे विचार राष्ट्रवादी आणि दाहक असल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान भारतात आले, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कारागृहात ठेवण्यात आले, हे देशाचे दुर्दैव आहे. देश स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराने चालला, तर भारतासह आजूबाजूच्या देशांचेही भाग्य उजळेल.

पुरस्कारार्थींची नावे

सैन्यदलाच्या वतीने दिला जाणारा ‘कीर्तीचक्र’ पुरस्कार सन्मानित नायब सुभेदार संतोष राळे यांना ‘शौर्य’ पुरस्कार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक अतुल राणे यांना ‘विज्ञान’ पुरस्कार, वडोदरा येथील वीर सावरकर स्मृती केंद्राला स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी वर्ष २०२१ च्या ‘शिखर सावरकर’ पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. यामध्ये ‘जीवनगौरव’ पुरस्कार, ‘एवरेस्ट वीर पद्मश्री’ पुरस्कार विजेत्या सोनम वांग्याल, ‘युवा’ पुरस्कार श्री. सुशांत अणवेकर, ‘उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था’ पुरस्कार रत्नागिरी येथील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स यांना प्रदान करण्यात आला.