१. उच्चस्तरीय शोधनिर्मितीचे कार्य सोडून ‘जे.एन्.यू.’चा अन्य कामांसाठी वापर होणे अनैतिक !
‘एका पत्रकाराने जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या चार दशकांमधील फलनिष्पत्तीविषयी विचारले. तेथील ‘रेक्टर’(वसतीगृह प्रमुख) च्या प्रमुखाने आतापर्यंत नागरी सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सांगितली. बातमीमध्ये उल्लेख करण्यालायक दुसरी फलनिष्पत्ती त्यांना सांगता आली नाही. विश्वविद्यालयाचे विद्यार्थी म्हटल्यावर ते रोजगाराची सिद्धता तर करतीलच, यात काही आश्चर्य नाही; परंतु ‘जे.एन्.यू.’विषयी एक प्रश्न उपस्थित होतो, तो पटणारा नाही. नागरी सेवांची सिद्धता करण्यासाठीच हे अतीविशेष विश्वविद्यालय निर्माण करण्यात आले होते का ? ज्यावर देशाची संपत्ती उदारपणे लुटण्यात येते ? त्यासाठी एखादे ‘रोजगार सिद्धतेचे छात्रालय’ही करता आले असते. तेथे चांगली निवासस्थाने आणि उत्तम भोजन व्यवस्था मिळाली असती. एका कामासाठी पैसा घ्यायचा आणि काम दुसरेच करायचे, ही नैतिकता आहे का ? जे विश्वविद्यालय उच्चस्तरीय शोधनिर्मितीसाठी निर्माण करण्यात आले होते आणि ज्यावर जनतेचे कोट्यवधी रुपये उधळले जातात, ते केवळ नोकरी मिळवणाऱ्यांसाठी ‘फर्स्ट क्लास हॉटेल’मध्ये परावर्तित होणे चुकीचे आहे. जेथे (कथित) विद्यार्थ्यांनी नोकरी, व्यापार, राजकारण, देशद्रोह यांसह विविध उद्योगधंद्यांमधून पैसा किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा उपक्रम राबवावा, हे अनुचित आहे.
२. ‘जे.एन्.यू.’ प्रारंभीपासूनच डाव्या राजकारणासाठी प्रसिद्ध असणे
विश्वस्तरीय संशोधन संस्था बनवण्याच्या नावावर असे विश्वविद्यालय बनवून जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा काय उपयोग झाला ? प्रारंभीपासूनच डाव्या राजकारणाची व्यवस्थित आणि सुसंघटित पद्धत हीच ‘जे.एन्.यू.’ची मुख्य ओळख राहिली आहे. त्याचे श्रेय तेथे प्रथमच नियुक्त करण्यात आलेल्या प्राध्यापकांना आहे. त्यांच्यात काही कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्षाचे थकलेले कार्यकर्ते होते. (राज थापर यांची आत्मकथा ‘ऑल दिज इअर्स’मध्ये त्याची जिवंत उदाहरणे मिळू शकतात.) त्यांच्या नियुक्त्यांमुळेच तेथे बौद्धिक गोंधळ चालू झाला आणि नंतर ती एक परंपराच होऊन गेली.
आजपर्यंत या विश्वविद्यालयाचे कोणताही प्रसिद्ध शोध, अभ्यास, आविष्कार किंवा लेखन यांविषयी एकही वृत्त वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेले नाही. तेथून ज्ञान, खेळ, रंगमंच, कला या क्षेत्रांमध्येही कधी योगदान मिळाले नाही. पाश्चात्त्य देशांमध्ये प्रसिद्ध शोध विश्वविद्यालयांमधून सामाजिक, वैज्ञानिक आदी क्षेत्रांविषयी ठोस योगदान मिळते, तसे ‘जे.एन्.यू.’कडे दाखवण्यासारखे विशेष काहीच नाही. एवढेच नाही, तर तेथून एखादी प्रसिद्ध शोधपत्रिका किंवा सामान्य विद्वत प्रकाशनही प्रसिद्ध होऊ शकले नाही, जे एखाद्याला वाचावेसे वाटेल.
३. ‘जे.एन्.यू.’मधील भारतविरोधी राजकारण अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा विषय होऊ शकत नाही !
जेथे केवळ राजकीय गोष्टींना अधिक महत्त्व असेल, तेथे गांभीर्याने अभ्यास किंवा लेखन अशा गोष्टींना वाव मिळत नाही. त्यामुळे केवळ डावे अणि भारतविरोधी राजकारणाच्या वृत्तांनीच ‘जे.एन्.यू.’ला प्रसिद्धी मिळत असते. ‘जे.एन्.यू.’मध्ये मोहालीच्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी भारतविरोधी घोषणा दिल्या’, ‘भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांवर आक्रमण झाले’, ‘अशोकस्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह जोड्यांखाली चुरगाळत असतांनाचे ‘पोस्टर’ (फलक) प्रसारित झाले’, अशा स्वरूपाची ती वृत्ते असतात. येथील व्यासपिठावरून अरूंधती राय हिने भारताच्या विरोधात नव्याने विषारी गरळओक केली. अशा प्रकारच्या बातम्या सतत येत असतात.
तेथे चालणाऱ्या ‘मुशायरा’मध्ये भारतावरील टीकेचा प्रतिवाद करणाऱ्या सैनिकांना मारहाण केली जाते, नक्षलवाद्यांकडून ७० सुरक्षारक्षकांची हत्या झाल्यावर या विश्वविद्यालयामध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला. ‘जे.एन्.यू.’मध्ये भारतावर टीका करणाऱ्या कोणत्याही देशी-विदेशी टीकाकाराला व्यासपीठ उपलब्ध होते; परंतु देशाच्या गृहमंत्र्याला बोलू दिले जात नाही. एवढेच नाही, तर त्यांच्या आगमनाच्या विरोधात आंदोलन केले जाते. यावरून ‘जे.एन्.यू.’मधील भारतविरोधी राजकारण अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा विषय होऊ शकत नाही; कारण तेथे हेच अधिकार स्वतंत्र किंवा राष्ट्रभक्त स्वरांना दिले जात नाहीत. ही काही आजची गोष्ट नाही. ३० वर्षांपूर्वीही तेथे देशाच्या पंतप्रधानांना बोलू दिले जात नव्हते. त्या काळात लेनिन, स्टॅलिन, माओ आणि यासिर अराफत यांना प्राध्यापक अन् विद्यार्थी संघटना दोन्ही डोक्यावर मिरवत असत.
४. बनावट शोधप्रबंधांच्या नावावर जनतेचे लक्षावधी रुपये वाया घालवणे
तेथील प्राध्यापकांकडे फलनिष्पत्ती सांगण्यासारखे काहीच नाही. कथित संशोधक कसेतरी काही पानांमध्ये लिहून त्यांच्या प्राध्यापकांकडे देतात. ज्या आधारे त्यांना ‘समाधानकारक’ कार्याचे गुण मिळतात. या निरर्थकतेकडे प्राध्यापक जाणूनबुजून दुर्लक्ष करतात, म्हणजे या कथित संशोधकांना प्रतिवर्षी वसतीगृहाच्या सुविधा मिळत रहातील. त्यांना एखादी नोकरी मिळाली की, ‘एम्.फील्’ किंवा ‘पीएच्.डी’ यांचे विद्यार्थी त्यांचे संशोधन तेथेच टाकून निघून जातात. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यावर ‘शोध अध्ययन’ करण्याच्या नावावर व्यय झालेले लक्षावधी रुपये पाण्यातच जातात. जे काही कथित शोधप्रबंध पूर्ण होतात, तेही या विश्वविद्यालयाच्या कपाटात पडून रहाण्याविना कोणत्याच कामाला येत नाहीत. ते कुणीही वाचत नाहीत; कारण प्रत्येकाला ठाऊक आहे की, त्यात अशी कोणतीही गोष्ट नाही, जी आधी उपलब्ध नव्हती.
‘असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’चे केंद्रीय नियतकालिक ‘युनिव्हर्सिटी न्यूज’मध्ये प्रकाशित झालेल्या आकलनानुसार या विश्वविद्यालयांमध्ये सर्वाेच्च शोधपदवीच्या कामाची स्थिती अशी आहे की, ८० टक्के ‘पीएच्.डी’चे प्रबंध बनावट (खोटे), दुसऱ्याची नक्कल केलेले आणि कचऱ्यात टाकण्यालायक असतात. अन्य विश्वविद्यालये आणि ‘जे.एन्.यू.’ यांच्यात एवढेच अंतर आहे की, येथे कचरा प्रबंध लिहिण्यासाठी जनतेचा चारपट पैसा नष्ट होतो.
५. ‘जे.एन्.यू.’मधील परिस्थितीसाठी विद्यार्थ्यांसमवेत प्राध्यापकही उत्तरदायी !
शोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही स्थिती असेल, तर बहुतांश प्राध्यापकांची स्थितीही जवळपास अशीच असणार. येथे राजकीय गोष्टींनाच अधिक महत्त्व दिले जाते. अन्य काही विद्वान खाण्या-पिण्याचे काम करतात. ‘यूजीसी’ आणि विविध उच्च शोध संस्थांकडून स्वीकृती मिळणाऱ्या शोध प्रकल्पांची पुरेशी माहिती असणाऱ्या एका केंद्रीय शिक्षण संस्थेच्या संचालकानुसार अनेक प्राध्यापकांना शोधाच्या नावावर एकच गोष्ट परत परत आणि विविध संस्थांच्या आर्थिक सहकार्याने करण्याची सवय लागली आहे. ‘जे.एन्.यू.’च्या इतिहास विभागाचे प्राध्यापकच याचे चांगले उदाहरण आहेत. त्यांच्या संपूर्ण लेखनाचे सार एकेका पानावर लिहिता येईल; कारण त्यात शोधाऐवजी राजकीय संदेश देण्याची केंद्रीयता आणि अधिरताच अधिक आहे.
६. ‘जे.एन्.यू.’ हा उच्च संशोधनाच्या आडून युवकांसाठी रोजगार किंवा राजकीय कारकीर्द घडवणाऱ्यांचा ‘अड्डा’ बनणे
‘जे.एन्.यू.’ परिसरात असलेल्या सर्व पुस्तकांची दुकाने याचे जिवंत पुरावे आहेत. तेथे केवळ नोकरीची सिद्धता किंवा राजकारणबाजी होते. ही दुकाने जवळपास विविध स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित माहिती आणि डाव्या विचारसरणीच्या साहित्याने भरलेली आहेत. त्यात इतिहास, राजकारण, साहित्य, दर्शन, अर्थशास्त्र आदी संबंधी प्रकाशने पाहिल्यावर वाटते की, ते किती जुने आहेत ! आजही ही दुकाने त्याच रशियायी, चिनी, युरोपीय साम्यवादी पुस्तक-पुस्तिका, आत्मचरित्रे आदींविषयी पुस्तकांनी भरलेली आहेत. ती ३० वर्षे जुनी आहेत. तेथे काही ताजी हिंदी नियतकालिके दिसतात, तेही बहुतांश साम्यवादधार्जिणी आहेत. त्यात अनेक दशके जुनी खोटी माहिती आणि काही बातम्या मिळून ‘बौद्धिक विश्लेषण’ छापण्यात येते. त्यात काही दशके झाली, तरी काहीच परिवर्तन झालेले नाही. हे साहित्य बौद्धिक विषाप्रमाणे प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना स्पर्श करते. याच डाव्या साहित्याला ‘अकॅडेमिक’ म्हटले जाते. समाजशास्त्र आणि साहित्य यांच्या विद्यार्थ्यांना हीच पुस्तके अन् नियतकालिके वाचण्यास बाध्य केले जाते. देशभरातून आलेल्या भोळ्याभाबड्या विद्यार्थ्यांसाठी चिंतन आणि मनन करण्यासाठी हेच मर्यादित, शिळे अन् भुकेल्यांचा आहार असलेले साहित्य वाढण्यात येते. ही ‘जे.एन्.यू’.ची खेदजनक ओळख झाली आहे.
यातून गुणवत्तेची आशा कधीच केली जाऊ शकत नाही. एखाद्याला वाटले, तरी तो समाजशास्त्राच्या विषयांमध्ये नवीन चिंतन, शोध आदींची प्रेरणा मिळवू शकत नाही. त्यामुळे हे विश्वविद्यालय ‘उच्च शोधा’च्या आडून युवकांसाठी मुख्यत: एखाद्या नोकरीचा शोध किंवा राजकीय कारकीर्द घडवणाऱ्यांचा ‘अड्डा’ होऊन बसले आहे.
७. ‘जे.एन्.यू.’चा वापर राष्ट्रनिर्मितीसाठी होणे आवश्यक !
नोकऱ्यांचा शोध घेणे, हे येथील प्रमुख ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) कार्य आहे. याला सर्वांची सहानुभूती आहे. येथील हिंदुविरोधी राजकारण हे प्रमुख धार्मिक कार्य आहे. त्याला येथे सक्रीय समर्थन आहे. येथे हिंदुविरोधी, सरकारविरोधी आणि देशविरोधी राजकारणाचे समर्थन केले जाते. विटंबना ही आहे की, हे करण्यासाठी सर्व पैसा हिंदु जनता, सरकार आणि देश यांच्याकडून घेतला जातो. अशा प्रकारे सर्वाधिक सुखसुविधायुक्त केंद्रीय विश्वविद्यालयाचा संपूर्ण शोध-व्यापार एका दिखाऊ कामात पालटलेला आहे. हाही एक घोटाळा आहे. ज्या उद्देशाने या ‘जे.एन्.यू.’ची स्थापना झाली होती, तो उद्देश कधीच गळून पडला आहे. कदाचित् त्या उद्देशाने तेथील कार्य कधी चालूच झाले नाही. हे विश्वविद्यालय केवळ विविध रोजगारासाठी प्रयत्न करणे आणि देशद्रोही राजकारण शिकणे-शिकवणे यांशिवाय क्वचितच दुसऱ्या कामासाठी राहिले असेल. त्यामुळे जेव्हाही ‘जेएन्यू’ची चर्चा होते, तर ती वाईट कारणांसाठीच !’
लेखक : प्राध्यापक डॉ. शंकर शरण
संपादकीय भूमिका‘जे.एन्.यू.’द्वारे होणारी जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि तेथील देशविरोधी वातावरण पहाता सरकारने त्यावर बंदीच घालायला हवी ! |