पैसा जिंकला, नाती हरली ! 

नुकतीच समोर आलेली एक बातमी मन सुन्न करणारी आहे. आईच्या अंत्यसंस्काराआधी तिच्या मुलींनी मालमत्तेची मागणी केली. ‘आधी मालमत्तेचे वाटे-हिस्से करा, मगच अंत्यविधी करा’, अशी अट घालत आईच्या निधनानंतर तिच्याच मुलींनी मालमत्तेसाठी वाद घातला. ज्या आईने जन्म दिला, वाढवले, तिच्या पार्थिवासमोर उभे राहून दुःखाऐवजी संपत्तीचा हिशोब मांडला जावा, ही घटना आजच्या समाजाच्या प्रचंड स्वार्थी मानसिकतेवर तीव्र प्रकाश टाकणारी आहे, तसेच असे वागणे, हे नैतिक अधोगतीचे लक्षण आहे. या निमित्ताने कौटुंबिक मूल्ये, संस्कार आणि धार्मिक-नैतिक दायित्व यांवर पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कायदा मुलींना संपत्तीत समान अधिकार देतोे; पण आईचा देह समोर असतांना तिचे उत्तरकार्य करण्याऐवजी पैशांवरून वाद घालणे, ही असंवेदनशीलतेची परमावधी आहे. आजचा माणूस पैशाच्या हव्यासापोटी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, याचे हे विदारक उदाहरण आहे. मुलांना केवळ उच्च शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य देणे, म्हणजेच उत्तम संगोपन नव्हे, तर त्यांच्यात कृतज्ञता, आदर अन् नात्यांची जपणूक करण्याचे ‘संस्कार’ रुजवणे किती आवश्यक आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होते. संस्कारहीन संपत्ती ही केवळ वाद आणि नाश यांना कारणीभूत ठरते, हेच यावरून दिसून येते.

सनातन संस्कृतीत ‘मातृदेवो भव’, ‘पितृदेवो भव’ म्हणजेच ‘आई आणि वडील हे देवासारखे पूजनीय आहेत’, अशी शिकवण आहे. आई-वडिलांच्या वृद्धावस्थेत त्यांची मनापासून सेवा करणे, हे प्रत्येक अपत्याचे परमकर्तव्य आहे. धर्मशास्त्रात या सेवेचे आणि त्यांच्या आशीर्वादाचे अफाट लाभ सांगितले आहेत. जे प्रतिदिन माता-पिता आणि वृद्ध यांना वंदन करतात, त्यांची सेवा करतात, त्यांना दीर्घायुष्य लाभते. विद्या, यश आणि बल प्राप्त होऊन त्याची निरंतर वृद्धी होते. शास्त्रानुसार माता-पित्यांची सेवा करणे, हे चारही धामची यात्रा किंवा सर्व तीर्थांमध्ये स्नान यांप्रमाणे श्रेष्ठ मानले गेले आहे.

अध्यात्मशास्त्रात मृत्यूनंतरच्या विधींना आणि अपत्यांच्या कर्तव्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. निधनानंतर शास्त्रोक्त पद्धतीने अंतिम संस्कार करणे आणि उत्तरकार्य करणे, हे अपत्यांचे कर्तव्य आहे. आई-वडिलांचा देह पंचतत्त्वात विलीन होण्यापूर्वी तिच्या आत्म्याला क्लेश देणे किंवा मृतदेहासमोर पैशांचे वाद घालणे, हे शास्त्र आणि नैतिक दृष्ट्या अत्यंत निंदनीय आहे. संपत्ती, भूमी आणि पैसा हे आज ना उद्या संपून जाईल; पण पालकांच्या अंतिम क्षणी गमावलेली नैतिकता अन् नात्यांमधील ओलावा कधीच परत येणार नाही. आपण भौतिक सुखांच्या मागे धावतांना माणूस म्हणून कंगाल होत चाललो आहोत का ? हा प्रश्‍न या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे !

–  सौ. गौरी वैभव आफळे, फोंडा, गोवा.