‘विश्‍वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !

स्वामी विवेकानंद

भारत वर्ष १९५० मध्ये ‘प्रजासत्ताक राष्ट्र’ झाल्यावर प्राथमिक घडणाची ७८ वर्षे उलटली आहेत. स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे विचार सांगितले, त्याला आता १२५ वर्षे होऊन गेली आहेत, तरी ते विचार आज अधिक प्रासंगिक आहेत. स्वामीजींची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. स्वामीजींचे दूरदर्शी ध्येय कोणते आहे ? ते ध्येय साध्य करण्यात अडचणी कोणत्या आहेत ? त्या दूर कशा करायच्या ? ते उपाय प्रत्यक्षात कसे आणावेत ? यांचे प्रतिपादन ‘विश्‍वगुरु भारत’ या ग्रंथामध्ये केलेले आहे.

२१ वे शतक हे भारताचे आहे. स्वामीजींचा रोख तरुण पिढीवर आहे. भारत देश आज लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वांत तरुण देश आहे, म्हणजे येथे ६५ टक्के लोकसंख्या ३० ते ४० वर्षे या वयोगटातील आहे. विशेषतः या वयोगटातील नागरिकांनाही, खरे म्हणजे सर्वांनाच आपापल्या आयुष्यात स्वामीजींचे विचार प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे.

दैनंदिन वाचनातून गुणसंवर्धन 

कोणतीही व्यक्ती कुटुंब, शाळा-महाविद्यालये आणि समाज या ३ क्षेत्रांतून स्वतःचे व्यक्तीमत्त्व विकसित करत असते. या तीनही क्षेत्रांतील मान्यवर सुचवतात, ‘दिसामाजी काहीतरी वाचन करावे.’ नित्य वाचनाने अनेक अवघड संकल्पना सहजपणे समजण्यात साहाय्य होते. नित्य वाचनाने मन ताजेतवाने रहाते. तणावमुक्ती साधते आणि मानसिक ताणतणाव दूर होतात. शब्द आणि विचार संग्रह वाढतो. स्मरणशक्तीचे संवर्धन होते. विवेचन शक्ती वाढते. मनाच्या एकाग्रतेमध्ये क्रमाक्रमाने वाढ होते. ध्येय आणि जीवन मार्ग स्पष्ट होतात. मनःशांती मिळते. नित्य नियम पाळण्याची सवय लागते.

(साभार : ग्रंथ ‘समग्र व्यक्तीमत्त्व विकास’, सुविचार दैनंदिनी)