संपादकीय
गेल्या काही मासांपासून आपण श्रीलंकेची दिवाळखोरीकडे होणारी वाटचाल पहात आहोत. त्यात आता आणखी काही देशांची भर पडत आहे. अर्थात्च यांतील एक देश म्हणजे भारताचा शत्रू असणारा पाकिस्तान ! हा देशही आता दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे. पाकच्या रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत साधारण २०० च्या जवळ पोचले आहे. डॉलरचा काळाबाजार वाढत आहे. ही सर्व स्थिती रोखण्यात पाक सरकार अपयशी ठरत आहे. यावर कुठेतरी नियंत्रण मिळवावे, या उद्देशाने सरकारने चैनीच्या आणि अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीवर कडक बंदी घातली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने विदेशी कर्जाचे हप्तेही भरले नाहीत. श्रीमंत वर्ग डॉलर्सचा साठा करत असल्याने त्याचा काळाबाजार होत आहे. या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेप्रमाणेच नव्या सरकारसमोर आता मोठे आव्हानच उभे राहिले आहे. पंतप्रधान शरीफ यांनी तातडीची बैठक बोलावली होती. १-२ दिवसांत हे चित्र काही पालटणार नाही. बांगलादेशही दिवाळखोर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वस्तू, इंधन, मालवाहतूक आणि खाद्यपदार्थ यांच्या किमती वाढल्यामुळे देशाचा आयात खर्च वाढला आहे. जुलै २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत बांगलादेशकडून वस्तूंवर केल्या जाणार्या खर्चात वाढ झाली आहे. दिवाळखोरीच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांना आता असंख्य संकटांचा सामना करावा लागणार आहे.
पालटत्या जीवनशैलीचा परिणाम !
गेल्या काही वर्षांत किंवा दशकांमध्ये दिवाळखोरीचे संकट काही देशांच्या संदर्भात वारंवार निर्माण होत असल्याचे दिसून येते. वर्ष १९९० च्या पूर्वी ही समस्या तीव्र स्वरूपात नव्हती. काही राष्ट्रांवर तेव्हाही आर्थिक संकट ओढवले होते; पण तत्कालीन जीवनशैली आताप्रमाणे तितकी आधुनिक किंवा पाश्चात्त्य नव्हती. त्यामुळे अर्थात्च व्यय तुलनेत पुष्कळ अल्प होता. अत्याधुनिक सोयीसुविधाच अस्तित्वात नव्हत्या. प्रत्येकाचे रहाणीमान अत्यंत साधे असल्याने अनेक गोष्टींची आयातही अल्प असायची. आयातीवर तितका व्ययच होत नसे. त्यामुळे आर्थिक बाजू जमेची असायची. त्यातही जरी का एखादा देश आर्थिक संकटात असला, तरी अशा सामान्य परिस्थितीमुळे त्यातून लवकर बाहेर पडता यायचे. त्यात एखादे राष्ट्र खितपत पडले किंवा कुणाला संकटांचा तावून सुलाखून सामना करावा लागला, असे कधी झाले नाही. सध्याच्या काळात आधुनिकता प्रत्येकाच्या जीवनात अगदी ठासून भरली असल्याने साहजिकच तिचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होतो. सध्या सर्वच राष्ट्रांचा आयातीवरील खर्च वाढला आहे; पण त्या तुलनेत निर्यातीतून मिळणारे उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे व्यापारी तूट भरून येतच नाही. याचा परिणाम परकीय चलनावर होतो. त्याचा साठा दिवसेंदिवस अल्प होत आहे. कालांतराने तो संपूही शकतो, इतकी स्थिती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील राष्ट्रांमध्ये निर्माण झाली आहे. भेडसावणारी आर्थिक स्थिती लक्षात घेता बांगलादेश सरकारने डॉलरच्या संकटाचा सामना करण्यासाठी चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनांच्या आयातीवर, तसेच सरकारी अधिकार्यांच्या विदेश प्रवासावर बंदी घातली आहे.
शत्रूही झाला दिवाळखोर !
दिवाळखोरीमुळे पाकिस्तानची स्थिती ‘जगातील सर्वांत गरीब देश’ अशीच काहीशी झाली आहे. पाकला प्रत्येक वेळी अन्य देशांच्या आर्थिक साहाय्यावरच अवलंबून रहावे लागते. त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा प्रचंड मोठा बोजाच आहे. अशा बिकट आणि प्रतिकूल स्थितीतून पाक सध्या वाटचाल करत आहे. पाकिस्तानवर अशी वेळ ओढवली आहे, ही गोष्ट भारताच्या दृष्टीने दिलासादायकच म्हणावी लागेल; कारण प्रत्येक वेळी भारताला उद्ध्वस्त करायचे स्वप्नच पाक पहात आला आहे. केवळ स्वप्न नव्हे, तर षड्यंत्र आणि मनसुबे रचत, तसेच आतंकवाद पोसत भारतावर विविध माध्यमांतून आक्रमणेही केलेली आहेत. भारताच्या शत्रूंमध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावरच आहे. त्यामुळे असे राष्ट्र दिवाळखोरीकडे वाटचाल करत असेल, तर त्याचे दु:ख कोणत्याही भारतियाला वाटणार नाही. उलट पाकच्या संदर्भात ‘स्वतःच्याच पायांवर धोंडा मारून घेतला आहे’ किंवा ‘पेरावे तसे उगवते’, या म्हणीही तितक्याच सार्थ ठरतील, हे निश्चित ! दारिद्र्य, अज्ञान, भ्रष्टाचार, गुन्हेगारी अशी अनेक संकटे पाकसमोर आहेतच. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने विविध देश आणि जागतिक बँक यांच्याकडून कर्जही घेतले. हे प्रमाणही अधिक आहे.
वर्ष २००० ते २०२० या काळात अर्जेंटिनाने दिवाळखोरीचे संकट अनुभवले होते. वर्ष २०१२ मध्ये ग्रीसवरही अशी वेळ ओढवली होती; पण आता दोन्ही देशांची आर्थिक स्थिती नियंत्रणात आहे. वर्ष १९९८ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. तेव्हा रशियाला स्वतःला महासत्ता झाल्याचे वाटत होते; पण शेवटी त्यालाही दिवाळखोरीची पायरी चढावी लागली. तेव्हा सरकारचे अस्तित्वच नष्ट होण्याइतकी वेळ देशावर ओढवली होती. वर्ष १९९१ मध्ये भारतालाही भीषण दिवाळखोरीचा सामना करावा लागला होता. दिवाळखोरीचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, अशा वेळी परकीय चलनाची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची ठरते. ते चलन नसल्यास देशाला अत्यावश्यक वस्तू आयातच करता येत नाहीत, उदा. जर भारताकडे डॉलर नसतील, तर तेलाची आयात कशी करणार ? त्यामुळे परकीय चलनाचे सुनियोजन करायला हवे. सध्या सर्वत्र आर्थिक संकटांचे ढग घोंघावत आहेत. त्यामुळे अराजक माजले असून वातावरण अस्थिर आहे. दिवाळखोरीतील राष्ट्राने आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी परराष्ट्र धोरण, मित्र आणि शत्रूराष्ट्र्रे, राष्ट्रहित, लोकहित, राजकीय सक्षमता, तसेच युद्धासारखी प्रतिकूल स्थिती अशा सर्वच बाजूंनी विचार करून कृतीशील व्हावे. गुडघे टेकण्यास भाग पाडणारे आर्थिक संकट परतवून लावण्यासाठी सक्षम आणि कणखर राजकीय नेतृत्वच हवे !
संपादकीय भूमिकाआर्थिक संकट परतवून लावण्यासाठी सक्षम आणि कणखर राजकीय नेतृत्व हवे ! |