शरद पवार यांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत आतंकवाद माजला !

भाजपचे संजय केणेकर आणि एजाज देशमुख यांचा घणाघात

भाजपचे संजय केणेकर (डावीकडे) आणि एजाज देशमुख पत्रकार परिषदेत बोलतांना

संभाजीनगर – महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मूकसंमतीने सरकार पुरस्कृत आतंकवाद माजला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उन्मादी कायर्कर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरले आहे. अशा गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय केणेकर आणि एजाज देशमुख यांनी १८ मे या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन धुडगूस चालवला !

एजाज देशमुख पुढे म्हणाले की, अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालवलेला धुडगूस आणि आतंकवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे. गुंडगिरी आणि आतंकवाद माजवणार्‍या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला, तसेच संयमी राजकारण करणारे शरद पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आहे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

गुन्हेगारांना सरकारचे संरक्षण !

संजय केणेकर म्हणाले की, पोलीसयंत्रणेस वेठीला धरून सत्ताधारी पुरस्कृत आतंकवादामुळे राज्यात अशांतता माजली आहे. विरोधकांना दहशतीच्या मार्गाने संपवण्याचा कुटील डाव सत्ताधारी पक्षाने आखला आहे. पालघरमधील साधूंचे हत्याकांड, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर करमुसे नावाच्या अभियंत्यास पोलिसांसमोर झालेली मारहाण, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावरील जीवघेणे आक्रमण, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे येथील कार्यक्रमात दहशत माजवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आणि पोलिसांनी अटक केल्यानंतरही एका अभिनेत्रीस मारहाण करण्याचा प्रयत्न या सर्व घटना राष्ट्रवादी काँग्रेसने कायदा हातात घेतल्याचे पुरावे आहेत. राज्याचे गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असल्यामुळे दंगेखोर कार्यकर्त्यांवर कारवाई न करता आतंकवादास सामोरे जाणार्‍यांवरच कारवाई केली जात असल्याने सत्ताधार्‍यांकडून जाणीवपूर्वक राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका बळावते. अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणानंतर जाहीर पत्रक काढून मारहाण करणे आणि तोडण्याचा आदेश दिला जात असतांना पोलीस अन् सरकार यांनी पाळलेले मौन म्हणजे या कटाचाच पुरावा आहे