आय.पी.एल्. ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणी ७ जणांना अटक

भाग्यनगर (तेलंगाणा) – केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘इंडियन प्रिमीयर लीग’ (आय.पी.एल्.) या क्रिकेट स्पर्धेतील ‘मॅच फिक्सिंग’च्या प्रकरणी ७ जणांना अटक केली. यामध्ये दिलीप कुमार, गुर्‍रम वासू, गुर्‍रम सतीश, सज्जन सिंह, प्रभु लाल मीणा, राम अवतार आणि अमित कुमार शर्मा यांचा समावेश आहे. ते पाकमधील वकास मलिक याच्या संपर्कात होते. यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे यंत्रणेने सांगितले आहे. स्पर्धेतील सामन्यांच्या परिणामांवर प्रभाव पाडण्यासाठी या लोकांची यंत्रणा कार्यरत होती. त्यांना पाकिस्तानमधून सूचना मिळत होत्या, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. सीबीआयने देहली, जयपूर, जोधपूर आणि भाग्यनगर या शहरांत कारवाई केली.

संपादकीय भूमिका

‘आय.पी.एल्.’ या मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या स्पर्धांमध्ये असे अपप्रकार होत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे; परंतु आजपर्यंत दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच असे प्रकार पुनःपुन्हा होतात. जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणार्‍या अशा खर्चिक खेळांवर सरकार बंदी का घालत नाही ?