ज्ञानवापीचे दुसर्‍या दिवशीचे सर्वेक्षण पूर्ण

आज शिल्लक २० टक्के सर्वेक्षण पूर्ण होणार

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी मशिदीच्या दुसर्‍या दिवसाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. दोन दिवसांत ८० टक्के सर्वेक्षण आणि चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. १६ मे या दिवशी एक ते दीड घंट्याचे आणखी सर्वेक्षण होणार आहे. १७ मे या दिवशी संपूर्ण सर्वेक्षण आणि चित्रीकरण यांचा अहवाल दिवाणी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

१. मशिदीचे ४ तळघर आणि परिसर येथे ढिगारा आणि मोठ्या प्रमाणात धूळ होती. हे सर्व स्वच्छ करून चित्रीकरण करण्यात अडचण निर्माण झाल्याने चित्रीकरण पूर्ण होऊ शकले नाही. या ढिगार्‍याच्या स्वच्छतेसाठी १० स्वच्छता कर्मचारी नेण्यात आले होते, तसेच येथे वीज नसल्याने बॅटरीच्या साहाय्याने काम केले जात होते.

२. १५ मे या दिवशी झालेल्या सर्वेक्षणात ज्ञानवापीच्या कोरीव घुमटाचे ड्रोनच्या साहाय्याने चित्रीकरण करण्यात आले, तसेच तलावाच्या आजूबाजूचे छत, ४ तळघर, बाहेरच्या भिंती आणि व्हरांडा यांचेही सर्वेक्षण अन् चित्रीकरण झाले.

३. १५ मे या दिवशी सर्वेक्षणाच्या वेळी १४ मेच्या तुलनेत अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी रस्त्यावर संचलन करून शांततेचे आवाहन केले.

आमचा दावा अधिक भक्कम झाला आहे ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

या खटल्यातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, या सर्वेक्षणानंतर आमचा दावा अधिक भक्कम झाला आहे. सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही, ते उद्याही होणार आहे.

हिंदु पक्षाच्या अन्य अधिवक्त्यांनी सांगितले की, सर्वेक्षणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षण उद्या एक ते दीड घंट्यात पूर्ण होईल. चित्रीकरण आणि छायाचित्रे ‘मेमरी कार्ड’मध्ये संरक्षित करण्यात आली आहेत. दोन्ही दिवशी नवीन ‘मेमरी कार्ड’ वापरण्यात आले आहे. सर्वेक्षणाविषयी दोन्ही पक्ष संतुष्ट आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे याविषयी आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.sun