मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण

हनुमानगड (राजस्थान) येथे मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेड काढल्याचा जाब विचारल्याचा परिणाम !

हनुमानगड (राजस्थान) – येथील रामदेव मंदिरासमोर बसलेल्या मुसलमान तरुणांनी मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेडछाड केल्याविषयी जाब विचारण्यास गेलेले विश्‍व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते सतवीर सहारण यांना लोखंडी सळीने मारहाण केल्याने सतवीर गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना बिकानेर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना ११ मेच्या रात्री घडली. या घटनेनंतर येथे विहिंपकडून निदर्शने करण्यात आल्याने येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी संवेदनशील भागात ध्वजसंचलन केले.

पोलीस अधीक्षक म्हणतात ही किरकोळ घटना !

विहिंपचे प्रांत संयोजक आशीष पारेख यांनी ‘आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा आम्ही पुढचे पाऊल उचलू’, अशी चेतावणी दिली आहे. दुसरीकडे पोलीस अधीक्षकांनी ‘ही घटना किरकोळ आहे’, असे म्हटले आहे. (एखाद्यावर प्राणघातक आक्रमण होणारी घटना किरकोळ आहे, असे म्हणणार्‍या पोलीस अधीक्षकांवर कारवाईच झाली पाहिजे; मात्र काँग्रेसच्या राज्यात असे घडणे अशक्यच आहे ! – संपादक) जिल्हाधिकार्‍यांनी ‘दोषींवर कठोर कारवाई करू’ असे आश्‍वासन दिले.

संपादकीय भूमिका

हा राजस्थान आहे कि पाकिस्तान ? गेल्या १-२ मासांमध्ये काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये हिंदूंवर सातत्याने होत असलेली आक्रमणे पहाता केंद्र सरकारने तात्काळ याची नोंद घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवरून राज्य सरकारला जाब विचारला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !