रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या उमेदवाराची धर्मांतरबंदी कायदा करण्याची मागणी

डिचोली, ७ मे (वार्ता.) – गोव्यात ‘बिलिव्हर्स’च्या नादी लागून अनेक हिंदू धर्मांतरित झाले आहेत. याला आळा घालण्यासाठी शासनाने गोव्यात लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी मागणी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे डिचोली येथील नेते अनिष नाईक यांनी केली आहे. सामाजिक माध्यमांत एक एक ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) प्रसारित करून त्यांनी ही मागणी केली आहे. अनिष नाईक यांनी नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक डिचोली मतदारसंघातून ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या तिकिटावर लढवली होती.

अनिष नाईक ध्वनिचित्रफितीमध्ये पुढे म्हणतात, ‘‘गोव्यात ‘बिलिव्हर्स’ नावाचा रोग आलेला आहे. यामुळे काही हिंदु बंधू-भगिनी धर्मांतरित झाले आहेत. या हिंदूंनी त्यांच्या घरातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती, चित्रे फेकून दिली आहेत, तसेच घरासमोरील तुळस मोडून टाकली आहे. हे धर्मांतरित हिंदू हिंदूच्या देवतांच्या चित्रांवरून चालतात. हे प्रकार असेच चालू राहिल्यास गोव्यात यापुढे हिंदु धर्म शेष रहाणार नाही. हिंदूंची मंदिरेही पुढे असणार नाहीत. हिंदु धर्मावर आज मोठे संकट आलेले आहे. सर्वांनी एकत्र येऊन शासनाकडे मागणी करावी लागेल की, ‘गोव्यात लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा लागू करावा’ आणि ही काळाची आवश्यकता आहे.’’